बेस्ट बेकरी खटला: दोन आरोपींची कोर्टाने केली निर्दोष मुक्तता, भीषण हत्याकांडात १४ जणांचा झाला होता मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2023 02:28 PM2023-06-13T14:28:37+5:302023-06-13T14:29:16+5:30
Best Bakery case: खटल्यातील दोन आरोपी हर्षद रावजीभाई सोलंकी आणि मफत मणिलाल गोहिल यांची मुंबईतील एका कोर्टाने निर्दोष मुक्तता केली आहे.
सन २००२ मध्ये झालेल्या गुजरात दंगलींदरम्यान, बडोद्यातील बेस्ट बेकरी जळीतकांडात १४ जणांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, या प्रकरणी सुरू असलेल्या खटल्यातील दोन आरोपी हर्षद रावजीभाई सोलंकी आणि मफत मणिलाल गोहिल यांची मुंबईतील एका कोर्टाने निर्दोष मुक्तता केली आहे. या प्रकरणातील सोलंकी आणि गोहिल हे दोन्ही आरोपी फरार आहेत.
२००२ मध्ये गोध्रा येथे साबरमती एक्स्प्रेसला लावलेल्या आगीत कारसेवकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणावर दंगे भडकले होते. त्याचवेळी हिंसक जमावाने बडोदा येथील बेस्ट बेकरीला आग लावली होती. या आगीत १४ जणांचा जळून मृत्यू झाला होता. या प्रकरणी बेस्ट बेकरीच्या मालकांची मुलगी जाहिरा शेख हिने २१ जणांविरोधात तक्रार दिली होती.
संतप्त जमावाने बेकरी चालवणाऱ्या शेख कुटुंबासह आत राहत असलेल्या मुस्लिमांना लक्ष्य केलं होतं. मृत्युमुखी पडलेल्या सर्व १४ जणांनी दंगलीदरम्यान बेस्ट बेकरीमध्ये आसरा घेतला होता. बेकरीमध्ये काम करत असलेल्या तीन हिंदू कामगारांचाही मृत्यू झाला होता.
या प्रकरणी २००३ मध्ये फास्ट ट्रॅक कोर्टाने सर्व आरोपींनी सबळ पुराव्यांअभावी निर्दोष मुक्त केले होते. त्यानंतर गुजरात हायकोर्टानेही हा निर्णय कायम ठेवला होता. त्यानंतर जाहिरा शेख हिने सामाजिक कार्यकर्त्या तीस्ता सेटलवाड यांच्या मदतीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने हा खटला गुजरातबाहेर चालवण्याचे आदेश दिले होते. पुढे हा खटला मुंबईतील स्पेशल कोर्टामध्ये वर्ग करण्यात आला.
या प्रकरणात मुंबईतील कोर्टाने २००६ मध्ये १७ आरोपींपैकी ९ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. तर या खटल्याचा निकाल लागेपर्यंत ४ आरोपींचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात फरार असलेल्या दोन आरोपींच्या वकिलांनी सदर आरोपींना गुजरातमधील फास्ट ट्रॅक कोर्टाने निर्दोश मुक्त केलेलं आहे, असा युक्तिवाद केला होता.