#Flashback2017 : हे आहेत मावळत्या वर्षातील गाजलेले वादविवाद

By balkrishna.parab | Published: December 27, 2017 01:19 PM2017-12-27T13:19:47+5:302017-12-27T15:18:47+5:30

भारतातील राजकारण आणि वादविवाद यांचं अगदी जवळचं नातं आहे. सरतं वर्षही अशाच राजकीय वादविवादांनी गाजलं.

# BestOf2017: Political disputes which were in media | #Flashback2017 : हे आहेत मावळत्या वर्षातील गाजलेले वादविवाद

#Flashback2017 : हे आहेत मावळत्या वर्षातील गाजलेले वादविवाद

Next

भारतातील राजकारण आणि वादविवाद यांचं अगदी जवळचं नातं आहे. सरतं वर्षही अशाच राजकीय वादविवादांनी गाजलं. अनेक नेत्यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे मोदा वादही निर्माण झाला. निवडणुकांच्या निमित्ताने झाडलेल्या आरोपांच्या फैरी आणि त्यावरुन झालेले आरोप - प्रत्यारोप यामुळे 2017 वर्ष चांगलंच गाजलं. 

- मोदींचा नीच व्यक्ती म्हणून उल्लेख
राजकारणात अनेक वाद हे किरकोळ असतात. त्यातून फारसा लाभ होत नाही. मात्र कधीकधी अनवधानाने केलेले वक्तव्यही फार नुकसान करून जाते. काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेले ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी गुजरात निवडणूक ऐन रंगात आली असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख नीच किस्मका आदमी असा केला. मणिशंकर अय्यर यांचे हे वक्तव्य काँग्रेसला बरेच महाग पडले. मोदी आणि भाजपाने या वक्तव्यावरून रान पेटवले. त्यामुळे सत्ताविरोधी लहरीचा सामना करत असलेल्या  निर्णायक क्षणी भावनिक राजकारण करून आपली सत्ता टिकवता आली.

- अण्णा द्रमुकमधील अंधाधुंदी
गतवर्षी जयललिता यांचे निधन झाल्यानंतर नेतृत्वहीन झालेल्या अण्णा द्रमुकमधील अंधाधुंदी तीव्र झाली. त्यात जयललिता यांच्या पश्चात सत्तासुत्रे हाती घेणाऱ्या शशिकला यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणात शिक्षा झाल्यानंतर पक्षातील बंडाळी तीव्र झाली. त्यातून पक्षात पनीरसेल्वम, पलानीस्वामी आणि दिनकरन असे तीन गट पडले. या तिन्ही गटांनी अण्णा द्रमुकच्या निवडणूक चिन्हावर दावा केल्याने  निवडणूक आयोगाला अण्णा द्रमुकचे दोन पाने असलेले चिन्ह गोठवावे लागले. नुकत्याच आटोपलेल्या आर.के. नगर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत विजय मिळवल्यानंतर दिनकरन यांनी अम्मांचे आपणच खरे वारस असल्याचा दावा केल्याने अण्णा द्रमुक पक्षातील वाद नव्या वर्षात अधिकच उफाळून येण्याची शक्यता आहे.

- समाजवादी पक्षातील भाऊबंदकी
मुलायमसिंग यादव आणि त्यांच्या वारस गोतावळ्याचा भरणा असलेल्या समाजवादी पक्षातील भाऊबंदकीमुळे उत्तर प्रदेशातील राजकारण चांगलेच चर्चेत राहिले. एकीकडे मुलायम सिंग यादव त्यांचे भाऊ शिवपाल यादव आणि मुलायमसिंगांच्या दुसऱ्या पत्नीचे कुटुंबीय. तर दुसरीकडे मुलायमसिंगांचे चिरंजीव अखिलेश यादव आणि मुलायमसिंगांचे चुलतभाऊ प्रा. रामगोपाल यादव यांच्यात पक्षातील वर्चस्वावरून बरीच रस्सीखेच झाली. अखेर या चढाओढीत अखिलेश यादव यांनी बाजी मारत पक्ष संघटनेवर ताबा मिळवला. पण अंतर्गत बंडाळीमुळे सपाला उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव पत्करावा लागला.

- मोदींनी मनमोहन सिंग यांच्यावर केलेली रेनकोट टिप्पणी
फर्डे वक्ते असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेली अनेक वक्तव्ये वादग्रस्त ठरली. विशेषतः राज्यसभेत डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर टीका करताना मोदींनी  रेनकोट घालून आंघोळ करावी, हे मनमोहन सिंग यांना माहीत आहे, अशी केलेली टिप्पणी वादाचा मुद्दा ठरली होती.

- नितीशकुमार विरुद्ध शरद यादव
बिहारमध्ये सत्ताधारी पक्ष असलेल्या संयुक्त जनता दलामध्येही भाजपाशी पुन्हा आघाडी करण्यावरून फूट पडली. मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा एक गट आणि ज्येष्ठ नेते शरद यादव यांचा गट निर्माण झाला. मात्र खासदार आणि आमदारांचा मोठा गट नितीश कुमार यांच्या मागे उभा राहीला. त्यामुळे निवडणूक आयोगाने निवडणूक चिन्ह नितीश कुमार यांच्या गटाकडे बहाल केले. त्यानंतर उपराष्ट्रपतींनी शरद यादव यांचे सदस्यत्व रद्द केले. त्यामुळे संयुक्त जनता दलावर नितीशकुमार यांचे वर्चस्व प्रस्थापित झाले.

- गुजरात राज्यसभा निवडणूक 
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांची प्रतिष्ठा पणाला लागल्याने गुजरात मधील राज्यसभा निवडणूक लक्षवेधी आणि वादग्रस्त ठरली. आमदारांची फोडाफोडी, दबाव तंत्र असे सगळे प्रकार झाल्याने निकाल देताना निवडणूक आयोगाची प्रतिष्ठा पणाला लागली होती. अखेर मध्यरात्रीपर्यंत चाललेल्या घडमोडींनंतर निवडणूक आयोगाने अहमद पटेल यांच्या बाजूने निकाल दिला.
 

Web Title: # BestOf2017: Political disputes which were in media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.