BSFच्या युनिफॉर्ममध्ये शहिदाच्या पत्नीची फसवणूक, 8 लाखांची लूट करून चोर परागंदा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2019 05:25 PM2019-02-12T17:25:44+5:302019-02-12T17:36:24+5:30
मध्य प्रदेशमध्ये एका चोरानं शहीद जवानाच्या पत्नीला फसवून 8.50 लाख रुपये लंपास केले आहेत.
भोपाळ- मध्य प्रदेशमध्ये एका चोरानं शहीद जवानाच्या पत्नीला फसवून 8.50 लाख रुपये लंपास केले आहेत. आरोपीनं बीएसएफचा युनिफॉर्म परिधान केला होता अन् महिलेला फसवलं. पैसे लुटण्यासाठी चोरानं वापरलेली ही युक्ती महिलेच्याही लक्षात आली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, श्रीनगरमध्ये 2013ला एक दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात ओमप्रकाश मर्दानिया हा जवान शहीद झाला होता. त्यानंतर आता चोरानं त्याची पत्नी कोमल मर्दानिया यांना ठकवलं. बीएसएफच्या युनिफॉर्ममध्ये आलेल्या चोरानं कोमलला बोलण्यात गुंतवून त्यांच्या खात्यातून 8 लाख रुपये वळते केले.
बीएसएफच्या युनिफॉर्ममध्ये आलेल्या चोरानं कोमलला भूल देऊन त्यांच्या खात्यातून 8 लाख रुपये काढल्यानंतर पोबारा केला. चोरांनी त्या महिलेच्या नातेवाईकाची एक बाईकही पळवली. त्यानंतर लागलीच त्या शहिदाच्या पत्नीनं पोलीस स्टेशन गाठलं आणि घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. ती म्हणाली, शहीद पतीचे पीएफ आणि इतर सहाय्यता निधी मिळून माझ्या खात्यात 35 लाख रुपये जमा करायचे आहेत, असे चोरांनी सांगितलं. त्यामुळेच मी त्या चोरांना माझ्या खात्यासंदर्भात माहिती दिली. तसेच पती शहीद झाल्यानंतर आलेले पैसे मी मुलांच्या खात्यात जमा केले होते. हे पैसेसुद्धा मी मुलांच्या खात्यात जमा करणार होती.
परंतु त्या चोरानं मला सासू आणि मुलांच्या खात्यात पैसे जमा करण्यास मज्जाव केला आणि सांगितलं की, तुमच्या खात्यात 35 लाख रुपये जमा होतील. आपल्याला फक्त 8.50 लाख रुपये काढून सासूच्या एसबीआय बँकेत टाकावे लागणार आहेत. पैसे काढल्यानंतर आरोपीनं ते स्वतःजवळ ठेवले. त्यानंतर त्या चोरानं मृत्यू प्रमाणपत्र आणि शपथपत्र बनवण्यासाठी जात असल्याचं सांगत तो मोटारसायकलवरून फरार झाला. चोर परत न आल्यानं कोमलला फसवणूक झाल्याचं लक्षात आलं आणि तिने पोलिसांत जाऊन याची तक्रार दिली.