देशासोबत गद्दारी! रशियातील भारतीय दुतावासाचा अधिकारी, पाकिस्तानी ISI ला देत होता लष्कराची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2024 04:03 PM2024-02-04T16:03:49+5:302024-02-04T16:04:32+5:30
भारत सरकारने या अधिकाऱ्याची आपला संरक्षण क्षेत्रातील सर्वात महत्वाचा साथीदार असलेल्या रशियामध्ये नियुक्ती केली होती.
परकीय लोक देशाविरोधात कटकारस्थाने करत आहेत, त्यात वेगळे काहीच नाहीय. परंतु इथे आपलेच लोक गद्दार निघाले तर काय करायचे? खड्यासारखे बाजुला करायचे... उत्तर प्रदेशच्या एटीएसने पाकिस्तानी आयएसआयला भारतीय सैन्याचे गोपनिय कागदपत्रे देणाऱ्या परराष्ट्र मंत्रालयाच्या बड्या अधिकाऱ्याला अटक केली आहे.
धक्कादायक बाब म्हणजे भारत सरकारने या अधिकाऱ्याची आपला संरक्षण क्षेत्रातील सर्वात महत्वाचा साथीदार असलेल्या रशियामध्ये नियुक्ती केली होती. या अधिकाऱ्याचे नाव सतेंद्र सिवाल असे असून तो उत्तर प्रदेशच्या हापुड जिल्ह्यातील राहणारा आहे. तो परराष्ट्र मंत्रालयामध्ये एमटीएस या पदावर कार्यरत होता. सध्या त्याची नियुक्ती रशियातील भारतीय दुतावासामध्ये होती.
दहशतवाद्यांचा माग काढताना उत्तर प्रदेशच्या एटीएसला आपल्या लष्कराचे गोपनिय कागदपत्र पाकिस्तानला पुरविले जात असल्याचा सुगावा लागला. पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयच्या एजंटांनी काही व्यक्तींद्वारे भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयातील काही अधिकाऱ्यांना पैशांचे आमिष दाखवून आपल्या बाजुने केल्याचे तपासात समोर आले होते. ही अशी माहिती होती ज्यामुळे देशाच्या अंतर्गत आणि सीमेवरील सुरक्षेला धोका निर्माण झाला असता.
तांत्रिक बाबींची चौकशी केल्यावर हा अधिकारी सतेंद्र असल्याचे समोर आले होते. तो आयएसआय हँडलर्सच्या नेटवर्कमध्ये सामील होऊन भारतविरोधी कारवायांमध्ये सहभागी असल्याचे पुरावे सापडले होते. भारतीय दूतावास, संरक्षण मंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालयासह भारतीय लष्करी आस्थापनांच्या धोरणात्मक हालचालींबाबत महत्त्वाची गोपनीय माहिती आयएसआयला पाठवत होता. सतेंद्रला मेरठला बोलावून चौकशी केली असता तो एटीएसच्या एकाही प्रश्नाचे समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही. नंतर त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली.