सीमेवर सतर्क राहा, लष्कर प्रमुखांचं जवानांना आवाहन
By Admin | Published: November 15, 2016 07:07 PM2016-11-15T19:07:57+5:302016-11-15T23:31:03+5:30
भारतीय लष्कर प्रमुख दलबीर सिंग सुहाग यांनी मंगळवारी जम्मू-काश्मीरमधल्या नियंत्रण रेषेवरच्या सुरक्षेचा आढावा घेतला आहे.
ऑनलाइन लोकमत
जम्मू, दि. 15 - भारतीय लष्कर प्रमुख दलबीर सिंग सुहाग यांनी मंगळवारी जम्मू-काश्मीरमधल्या नियंत्रण रेषेवरच्या सुरक्षेचा आढावा घेतला आहे. पाकिस्तानकडून दगाफटका होण्याची शक्यता असल्यानं जवानांनी सतर्क आणि आक्रमक राहावे, अशी सूचना लष्कर प्रमुखांनी जवानांना केली आहे.
पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतानं केलेल्या सर्जिकल स्ट्राइकनंतर दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. नियंत्रण रेषेवर भिम्बेर सेक्टरमध्ये भारतीय सैन्यानं केलेल्या गोळीबारात पाकिस्तानचे सात सैनिक मारले गेल्याचा दावा सोमवारी पाकिस्तानने केला. दरम्यान, भारतीय लष्कर प्रमुखांनी उधमपूरमधल्या नॉर्दन कमांड हेडक्वॉर्टरला भेट देऊन जवानांचीही विचारपूस केली आणि जम्मू-काश्मीरमधल्या नियंत्रण रेषेवरच्या सुरक्षेचा आढावा घेतला. तसेच, पाकिस्तानकडून होणा-या सीमेवरील शस्त्रसंधीबाबत जवानांना सतर्क राहणाच्या सूचना दिल्या.
नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन करून गोळीबार करणाऱ्या पाकिस्तानला जवानांना धडा शिकविण्यासाठी रविवारी रात्री भारताने जोरदार प्रत्युत्तर दिले. या वेळी भारताने तोफगोळ्यांचाही तुफान मारा केला आणि रणगाडेविरोधी क्षेपणास्त्रही वापरले, अशी माहिती सूत्रांकडून मिळते आहे. मात्र भारतानेच शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याचा उलट्या बोंबा मारणे पाकिस्तानने सुरूच ठेवले आहे. प्रत्यक्षात भारतीय सीमेवर सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करून, कुरापती काढणाऱ्या पाकिस्तानला भारतीय जवान आक्रमकपणे प्रत्युत्तर देत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर लष्कर प्रमुखांनी जम्मू-काश्मीरमधल्या नियंत्रण रेषेवरील भागाला भेट दिली आहे.