'आमच्या कुटुंबाला हात लावलात तर खबरदार', अधिका-याची दहशतवाद्यांना चेतावणी
By admin | Published: March 9, 2017 08:56 AM2017-03-09T08:56:21+5:302017-03-09T09:07:38+5:30
जम्मू काश्मीरचे पोलीस महासंचालक एस पी वैद यांनी दहशतवाद्यांना पोलिसांच्या कुटुंबांवर हल्ला न करण्याची चेतावणी दिली आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 9 - जम्मू काश्मीरचे पोलीस महासंचालक एस पी वैद यांनी दहशतवाद्यांना पोलिसांच्या कुटुंबांवर हल्ला न करण्याची चेतावणी दिली आहे. काश्मीर खो-यात पोलीस कुटुंबांवर होत असलेले हल्ले थांबवण्यास त्यांनी सांगितलं आहे. 'आपल्या या लढाईत कुटुंबांना आणू नका. तुम्हालाही कुटुंब आबे. जर तुम्ही आमच्या कुटुंबाचा छळ केलात तर आम्ही तुमच्या कुटुंबासोबत देखील तेच करु', असं डीजीपी वैद बोलले आहेत.
काही दिवसांपुर्वी दहशतवाद्यांनी एका पोलीस अधिका-याची घरात घुसून तोडफोड करत कुटुंबाला धमकावलं होतं. पोलिसातील नोकरी सोडायला सांगा अन्यथा त्याचे परिणाम भोगा अशी धमकीच त्यांनी कुटुंबियांना दिली होती. त्यानंतर डीजीपी वैद यांचं हे वक्तव्य आलं आहे.
शनिवारी जवळपास दहा दहशतवादी ऑटोमॅटिक रायफल्ससहित श्रीनगरमध्ये कार्यरत असलेल्या पोलीस उपमहासंचालकाच्या घरात घुसले होते. यावेळी त्यांनी घरात इलेक्ट्रॉनिक वस्तूंची तोडफोड करत नासधूस केली. या दहशतवाद्यांनी आपला संदेश अधिका-यापर्यंत पोहोचवण्यास सांगत कुटुंबाला धमकावलं. 'त्यांनी आम्हाला सांगितलं की पोलीस दहशतवादी आणि त्यांना आश्रय देणा-यांच्या संपत्तींची नासधूस करत आहेत. आमचा हा हल्ला त्यांच्या या कृत्याची प्रतिक्रिया आहे', अशी माहिती अधिका-याच्या कुटुंबियाने दिली आहे.
पोलीस महासंचालक एस पी वैद यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं की, 'या भांडणात कुटुंबियांना मधे आणण्याची गरज नाही. जर पोलिसांनी दहशतवाद्यांच्या कुटुंबियांसोबत हाच व्यवहार केला तर त्यांना कसं वाटेल ?.'