महाराष्ट्राच्या राज्यपालपदी भगत सिंह कोश्यारी; राष्ट्रपतींनी 5 राज्यांचे राज्यपाल केले नियुक्त
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2019 11:51 AM2019-09-01T11:51:40+5:302019-09-01T11:52:03+5:30
माजी केंद्रीय मंत्री आरिफ मोहम्मद खान यांची केरळच्या राज्यपालपदी नियुक्ती केली आहे.
नवी दिल्ली - उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगत सिंह कोश्यारी यांची महाराष्ट्र राज्याच्या राज्यपाल पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. सी. विद्यासागर राव यांचा कार्यकाळ संपल्यानंतर ही नियुक्ती करण्यात आली आहे. सी. विद्यासागर राव यांनी दिनांक 30 ऑगस्ट 2014 रोजी महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची शपथ घेतली होती. त्यांचा 5 वर्षाचा कार्यकाळ 30 ऑगस्ट 2019 रोजी संपला आहे.
तसेच माजी केंद्रीय मंत्री आरिफ मोहम्मद खान यांची केरळच्या राज्यपालपदी नियुक्ती केली आहे. आरिफ मोहम्मद खान हा मुस्लीम चेहरा केरळसाठी देण्यात आला आहे. तिहेरी तलाक तसेच अनेक मुस्लीम हिताच्या निर्णयामध्ये त्यांची महत्वपूर्ण भूमिका होती. काँग्रेसमध्ये असलेले आरिफ मोहम्मद खान अनेक काळ राजकारणापासून दूर होते. आरिफ मोहम्मद खान त्यांच्यासोबत तेलंगणाच्या राज्यपालपदी तमिलसाई सुंदरराजन, बंडारू दत्तात्रय यांना हिमाचल प्रदेश तर कलराज मिश्र यांना राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती केली आहे.
Kalraj Mishra, Governor of Himachal is transferred & appointed as Governor of Rajasthan. Bhagat Singh Koshyari appointed as Governor of Maharashtra, Bandaru Dattatreya as Governor of Himachal, Arif Mohammed Khan as Guv of Kerala, Tamilisai Soundararajan as Governor of Telangana pic.twitter.com/oKOe8xUOOz
— ANI (@ANI) September 1, 2019
भगत सिंह कोश्यारी यांचा जन्म 17 जून 1942 रोजी झाला आहे. उत्तराखंडमधील भाजपाचे सदस्य ते राष्ट्रीय उपाध्यक्ष असा त्यांचा भारतीय जनता पक्षातील प्रवास आहे. तसेच उत्तराखंडमधील भाजपाचे पहिले प्रदेशाध्यक्ष राहिले होते. 2001 ते 2002 मध्ये उत्तराखंड राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलं आहे. तर 2002 पासून 2007 पर्यंत उत्तराखंड विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. 2008 ते 2014 पर्यंत ते राज्यसभेचे सदस्य म्हणून उत्तराखंडमधून निवडून गेले होते. भगत सिंह कोश्यारी हे आरएसएस संघटनेशी जवळीक आहे. 1977 मध्ये आणीबाणीला केलेल्या विरोधामुळे त्यांना जेलमध्ये जावं लागलं होतं.