भगतसिंह कोश्यारींचा राजीनामा अखेर मंजूर, रमेश बैस महाराष्ट्राचे नवे राज्यपाल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2023 09:42 AM2023-02-12T09:42:30+5:302023-02-12T09:43:00+5:30
Ramesh Bais : भगतसिंह कोश्यारी यांनी दिलेला राज्यपालपदाचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजूर केला आहे. तर रमेश बैस यांची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
मुंबई - वेगवेगळे राजकीय निर्णय आणि विधानांमुळे सातत्याने वादाच्या भोवऱ्यात सापडलेले भगतसिंह कोश्यारी यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदावरची कारकीर्द संपुष्टात आली आहे. भगतसिंह कोश्यारी यांनी दिलेला राज्यपालपदाचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजूर केला आहे. तर रमेश बैस यांची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. रमेश बैस यांनी याआधी झारखंड आणि त्रिपुराचे राज्यपाल म्हणून काम पाहिले आहे. तसेच वाजपेयी सरकारच्या काळात त्यांनी मंत्रिपदही सांभाळले होते.
Ramesh Bais appointed as the new Governor of Maharashtra; President of India has accepted the resignation of Bhagat Singh Koshyari as Governor of Maharashtra. pic.twitter.com/9mco3tSTkI
— ANI (@ANI) February 12, 2023
२०१९ मध्ये महाराष्ट्रात घडलेल्या नाट्यमय राजकीय घडामोडी आणि नंतर आलेले महाविकास आघाडीचे सरकारच्या काळात घेतलेल्या विविध राजकीय भूमिका, रखडवून ठेवलेली १२ राज्यपाल नियुक्त आमदारांची नियुक्ती यामुळे भगतसिंह कोश्यारींवर टीका झाली होती. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेले विधान, तसेच महात्मा फुलेंबाबत काढलेल्या उदगारांमुळे कोश्यारी हे वादाच्या भोवऱ्यात सापडले होते.
दरम्यान, महाराष्ट्रासह एकूण १३ राज्यांमधील राज्यपाल बदलण्यात आले आहेत. त्यामध्ये अरुणाचल प्रदेशच्या राज्यपालपदी कैवल्य त्रिविक्रम परनाईक, सिक्कीमच्या राज्यपालपदी लक्ष्मण प्रसाद आचार्य, झारखंडच्या राज्यपालपदी सी.पी. राधाकृष्णन, हिमाचल प्रदेशच्या राज्यपालपदी शिव प्रताप शुक्ला, आसामच्या राज्यपालपदी गुलाब चंद कटारिया, आंध्र प्रदेशच्या राज्यपालपदी एस. अब्दुल नझीर, छत्तीसगडच्या राज्यपालपदी बिस्वा भूषण हरिचंदन, मणिपूरच्या राज्यपालपदी अनुसुईया उईके, नागालँडच्या राज्यपालपदी एल. गणेशन, मेघालयच्या राज्यपालपदी फागू चौहान, बिहारच्या राज्यपालपदी राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर, रमेश बैस यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी तर बी. डी. मिश्रा यांची लडाखच्या नायब राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.