'सुवर्ण मंदिरातून भगतसिंग यांचा फोटो काढा', त्या वादग्रस्त खासदाराची धक्कादायक मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2022 20:09 IST2022-07-26T20:08:07+5:302022-07-26T20:09:32+5:30
शहीद-ए-आज़म भगतसिंग यांना दहशतवादी म्हटल्यानंतर खासदार सिमरनजीत सिंग मान यांनी पुन्हा एक नवा वाद निर्माण केला आहे.

'सुवर्ण मंदिरातून भगतसिंग यांचा फोटो काढा', त्या वादग्रस्त खासदाराची धक्कादायक मागणी
चंदीगड: शहीद-ए-आज़म भगतसिंग यांना दहशतवादी म्हटल्यानंतर आता खासदार सिमरनजीत सिंग मान यांनी पुन्हा एकदा नवा वाद निर्माण केला आहे. मान यांच्या नेतृत्वाखालील शिरोमणी अकाली दल (अमृतसर) ने सुवर्ण मंदिराच्या सेंट्रल शीख संग्रहालयातून भगतसिंग यांचा फोटो काढण्याची मागणी केली आहे.
सिमरनजीत सिंग मानचा मुलगा इमान सिंग मानच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने एसजीपीसी अध्यक्ष हरजिंदर सिंग धामी यांना पत्र दिले आहे. भगतसिंग स्वत:ला नास्तिक मानत असल्याने त्यांचा फोटो संग्रहालयातून काढून टाकण्यात यावा, असे त्या पत्रात म्हटले आहे. विशेष म्हणजे, संगरुर लोकसभेच्या पोटनिवडणुकीत विजयी झाल्यापासून सिमरनजीत सिंग मान एकापाठोपाठ एक वादग्रस्त विधाने करत आहेत.
मान अजूनही आपल्या शब्दावर ठाम
महान क्रांतिकारक भगतसिंग यांना दहशतवादी म्हटल्यानंतर अकाली दल (अमृतसर)चे सुप्रीमो सिमरनजीत सिंग मान यांनी जाहीरपणे माफी मागण्यास नकार दिला. त्यानंतर दिल्ली भाजप नेत्याने मान यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. स्वातंत्र्यसैनिक भगतसिंग यांची तुलना दहशतवादाशी करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. आपण आपल्या शब्दावर ठाम असून, माफी मागणार नाही, असे मान म्हणाले होते. पण जेव्हा या प्रकरणाने जोर धरला तेव्हा मान यांनी आपल्या शब्दांचा विपर्यास केल्याचा आरोप केला आणि दिल्लीतच काउंटर एफआयआर दाखल केला.