भगतसिंगांचे नाव भाजपने डावलले; काँग्रेसचा आरोप
By admin | Published: March 24, 2016 12:39 AM2016-03-24T00:39:10+5:302016-03-24T00:39:10+5:30
भाजपच्या राष्ट्रवादाच्या मोहिमेला सडेतोड प्रत्युत्तर देण्यासाठी काँग्रेसने विद्यार्थ्यांना पुढे करीत संघर्षाचे डावपेच तयार केले आहेत
शीलेश शर्मा, नवी दिल्ली
भाजपच्या राष्ट्रवादाच्या मोहिमेला सडेतोड प्रत्युत्तर देण्यासाठी काँग्रेसने विद्यार्थ्यांना पुढे करीत संघर्षाचे डावपेच तयार केले आहेत. सोबतच भाजप केवळ देशाची दिशाभूल करण्यासाठी राष्ट्रवादाची खेळी खेळत असल्याचे सिद्ध करण्यासाठी काँग्रेसतर्फे तथ्यांची जुळवाजुळव करण्यात येत आहे. याच शृंखलेत पक्षाने बुधवारी पहिला वार केला.
इ.स.२००९ साली तत्कालीन हरियाणा सरकारने राज्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळाला क्रांतिकारक शहीद भगतसिंग यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला होता; परंतु विद्यमान भाजप सरकारने हा निर्णय बदलून या विमानतळाचे नामकरण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक राहिलेले मंगलसिंग यांच्या नावे करण्याचे ठरविले, असा आरोप काँग्रेसच्या प्रवक्त्या शोभा ओझा यांनी केला.
या निर्णयावर टीका करताना त्या म्हणाल्या की, भाजप राष्ट्रवादाचे केवळ नाटक करीत असून या पक्षाला राष्ट्रवादाशी काही देणेघेणे नाही. आज भगतसिंग यांच्यासारख्या देशभक्ताच्या नावाचा वापर करण्याचा प्रयत्न होत असला तरी यांचा अजेंडा वेगळा आहे. त्यामुळेच भगतसिंगांचे नाव हटवून विमानतळाला संघ प्रचारकाचे नाव देण्यात आले. पंतप्रधान यावर मौन का बाळगत आहेत? असा सवाल काँग्रेस प्रवक्त्याने केला.