तुरुंगात भगवद्गीता, रामायण वाचायचेय... मुख्यमंत्री केजरीवाल यांना न्यायालयीन कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2024 06:43 AM2024-04-02T06:43:25+5:302024-04-02T06:43:55+5:30
Arvind Kejriwal: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची १५ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडीत तिहार तुरुंगात रवानगी करण्यात आली. तुरुंगात आपल्याला रामायण, श्रीमद्भगवद्गीता आणि ‘हाऊ प्राईम मिनिस्टर्स डिसाईड’ ही पुस्तके वाचण्यासाठी मिळावीत म्हणून केजरीवाल यांनी विनंती केली आहे.
नवी दिल्ली - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची १५ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडीत तिहार तुरुंगात रवानगी करण्यात आली. तुरुंगात आपल्याला रामायण, श्रीमद्भगवद्गीता आणि ‘हाऊ प्राईम मिनिस्टर्स डिसाईड’ ही पुस्तके वाचण्यासाठी मिळावीत म्हणून केजरीवाल यांनी विनंती केली आहे.
त्यांना क्रमांक दोनच्या तुरुंगात ठेवण्यात आले आहे. दिल्ली मद्य धोरण प्रकरणातील आरोपी माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि आम आदमी पार्टीचे राज्यसभेतील नेते संजय सिंह यापूर्वीच तिहार तुरुंगात अटकेत असून, मनी लाँड्रिंग प्रकरणातील आरोपी माजी आरोग्यमंत्री सत्येंद्र जैनही तिहार तुरुंगातच आहेत.
फोनचा पासवर्ड मिळेना
केजरीवाल तपासात सहकार्य करीत नसून त्यांच्याकडे असलेल्या ॲपलच्या चार मोबाइल फोनचे पासवर्ड देत नसल्याचे ईडीच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एस. व्ही. राजू यांनी न्यायालयात सांगितले. केजरीवाल यांच्या फोनचे पासवर्ड मिळावेत म्हणून ईडीने ॲपलकडे विनंती केली आहे.
ही तर हुकूमशाही : सुनीता
- पंतप्रधान मोदी यांची कृती देशासाठी चांगली नाही, अशी प्रतिक्रिया न्यायालयात प्रवेश करताना केजरीवाल यांनी दिली. अकरा दिवसांची चौकशी पूर्ण झाली असून, न्यायालयाने दोषी ठरविले नसताना केजरीवाल यांना तुरुंगात का टाकले?
- निवडणुकीदरम्यान केजरीवाल यांना तुरुंगात टाकण्याचा भाजपचा एकमेव उद्देश आहे. देशातील जनता या हुकूमशाहीचे उत्तर देईल, असे त्यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल म्हणाल्या.