Bhagwant Maan: 'मान'नीय मुख्यमंत्री! भगवंत मान यांनी घेतली पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2022 01:37 PM2022-03-16T13:37:30+5:302022-03-16T14:32:42+5:30
Bhagwant Maan:या शपथविदी सोहळ्याला अरविंद केजरीवाल यांच्यासह आपचे सर्व नेते उपस्थित होते.
चंदीगड: AAP चे भगवंत मान (Bhagwant Maan) पंजाबचे 17 वे मुख्यमंत्री बनले आहेत. आज भगवंत मान यांनी शहीद भगतसिंग यांचे गाव खटखड कलां येथे पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल बनवारी लाल पुरोहित यांनी मान यांना गोपनियतेची शपथ दिली. यावेळी मंचावर आपचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासह आपचे अनेक नेते उपस्थित होते.
Bhagwant Mann takes oath as the Chief Minister of Punjab in Khatkar Kalan. pic.twitter.com/LRJjwUVT8S
— ANI (@ANI) March 16, 2022
हा भव्य शपथविधी सोहळा 100 एकराच्या परिसरात झाला. यातील 44 एकरवर मंडप उभारण्यात आला होता. या शपथविधी सोहळ्याला सुमारे 3 ते 4 लाख लोक उपस्थित होते. सोहळ्यात 50 हजार लोकांच्या बसण्याची सोय केली होती, तर उर्वरित ठिकाणी एलईडी बसविण्यात येणार होते. सोहळ्याच्या सुरक्षेसाठी आठ हजार पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले.
पंजाब निवडणुकीत 'आप'ने 92 जागा जिंकल्या
पंजाब विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने मोठा विजय मिळवला आणि दोन तृतीयांश बहुमताने सत्ता स्थापन केली. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निकालांनुसार, आम आदमी पक्षाने पंजाबमध्ये 117 जागांपैकी 92 जागा जिंकल्या, तर काँग्रेसला केवळ 18 जागा जिंकता आल्या. शिरोमणी अकाली दल तीन जागा आणि भाजपने दोन जागा जिंकल्या, तर बसपने एक जागा जिंकली आणि अपक्षांनीही एक जागा जिंकली.
विनोदी कलाकार ते मुख्यमंत्री
भगवंत मान यांच्या करिअरची सुरुवात कॉमेडियन म्हणून झाली होती. त्यांनी 2008 मध्ये कपिल शर्मासोबत 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज' या टीव्ही शोमध्ये भाग घेतला होता. त्या शोमधून भगवंत मान यांना खूप प्रसिद्धी मिळाली. कॉमेडीसोबतच भगवंत यांना अभिनयातही खूप रस होता. त्यांनी अनेक चित्रपटातही काम केले आहे.
पंजाब पीपल्स पार्टीमधून राजकीय कारकिर्दीची सुरुवात
प्रकाशसिंग बादल यांचे पुतणे आणि तत्कालीन अर्थमंत्री मनप्रीत सिंग बादल यांनी मार्च 2011 मध्ये पंजाबमध्ये पीपल्स पार्टीची स्थापना केली तेव्हा भगवंत मान यांनी राजकारणात प्रवेश केला आणि पीपीपीच्या संस्थापक नेत्यांपैकी एक बनले. फेब्रुवारी 2012 मध्ये पंजाब विधानसभेच्या निवडणुकीत, भगवंत मान यांनी लेहरागागा मतदारसंघातून पीपीपी उमेदवार म्हणून निवडणूक लढवली, परंतु त्यांचा पराभव झाला.
भगवंत मान यांनी आम आदमी पक्षात प्रवेश केला
पीपल्स पार्टीला विधानसभा निवडणुकीत एकही जागा मिळाली नाही, त्यानंतर मनप्रीत सिंग बादल यांनी काँग्रेसमध्ये जाण्याची तयारी सुरू केली. दुसरीकडे, भगवंत मान यांनी काँग्रेसमध्ये जाण्याऐवजी वेगळा मार्ग निवडला आणि 2014 मध्ये आम आदमी पार्टीमध्ये (आप) प्रवेश केला.
सलग 2 लोकसभा निवडणुकीत विक्रमी विजय
2014 च्या लोकसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला पंजाबमध्ये प्रचंड पाठिंबा मिळाला आणि पक्षाने भगवंत मान यांच्या जागेसह चार जागा जिंकल्या. या निवडणुकीत भगवंत मान हे आम आदमी पक्षाच्या प्रचाराचा चेहरा होते आणि ते संगरूर लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले. यानंतर 2019 च्या लोकसभा निवडणुकीतही भगवंत मान विजयी झाले.