Bhagwant Maan: 'CM भगवंत मान दारुच्या नशेत होते, म्हणूनच विमानातून खाली उतरवले', सुखबीर सिंग बादलांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2022 03:20 PM2022-09-19T15:20:12+5:302022-09-19T15:39:14+5:30
मुख्यमंत्री भगवंत मान यांनी जास्त दारू प्यायल्याने जर्मनीतील एअरलाइन्सने विमानातून उतरवल्याचा दावा करण्यात येतोय.
मोहाली: शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीर सिंग बादल यांनी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Maan) यांच्याबाबत धक्कादायक दावा केला आहे. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना लुफ्थांसा एअरलाइन्समधून खाली उतरवण्यात आल्याचा दावा बादल यांनी केला आहे. यांच्या म्हणण्यानुसार, सीएम मान यांनी जास्त दारू प्यायल्याने एअरलाइन्सने हे पाऊल उचलले. मीडिया रिपोर्ट्सचा हवाला देत बादल यांनी हा दावा केला आहे. दुसरीकडे आम आदमी पक्षाने मुख्यमंत्री भगवंत मान यांना विमानातून खाली उतरवल्याच्या बातम्या निराधार असल्याचे म्हटले आहे.
भगवंत मान नुकतेच जर्मनीला गेले होते. सुखबीर बादल यांनी ट्विट केले की, 'पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना लुफ्थांसा एअरलाइन्समधून खाली उतरवण्यात आले. सहप्रवाशांच्या हवाल्याने काही मीडिया रिपोर्ट्समध्ये हे दावे केले जात आहेत. मान यांच्यामुळे विमानाला चार तास उशीर झाला. हा रिपोर्ट जगभरातील पंजाबींना लाजवेल असा आहे.'
Disturbing media reports quoting co-passengers say Pb CM @BhagwantMann was deplaned from Lufthansa flight as he was too drunk to walk. And it led to a 4-hour flight delay. He missed AAP's national convention. These reports have embarrassed & shamed Punjabis all over the globe.1/2 pic.twitter.com/QxFN44IFAE
— Sukhbir Singh Badal (@officeofssbadal) September 19, 2022
ते पुढे म्हणाले की, 'धक्कादायक बाब म्हणजे पंजाब सरकार मुख्यमंत्र्यांबाबतच्या अशा रिपोर्टवर मौन बाळगून आहे. अरविंद केजरीवाल यांनी याबाबत स्पष्टीकरण द्यावे. पंजाबी आणि राष्ट्रीय अभिमानाची बाब असल्याने भारत सरकारने पावले उचलली पाहिजेत. जर मान यांना विमानातून खाली उतरवले असेल, तर भारत सरकारने यावर जर्मन अधिकाऱ्यांसोबत चर्चा करायला हवी.' दुसरीकडे ब्रिकम सिंह मजिठिया यांनीही या प्रकरणी भगवंत मान यांची खरडपट्टी काढली आहे.
भाजप खासदाराचा टोला
विरोधी पक्षनेते प्रताप सिंह बाजवा यांनी या वृत्तांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. सीएम भगवंत मान प्रवास करण्याच्या स्थितीत नसल्यामुळे त्यांना फ्रँकफर्टमध्ये उतरवण्यात आल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे. त्यांनी नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे हा मुद्दा मांडण्याची मागणी केली आहे. भाजप खासदार परवेश वर्मा यांनी ट्विट करून म्हटले की, भगवंत मान यांनी केजरीवाल यांना भारतात आणि परदेशात दारूला हात लावणार नाही असे वचन दिले होते.
'आप'ने आरोप फेटाळले
आपचे प्रवक्ते मलविंदर सिंग कांग यांनी इंडिया टुडेशी संवाद साधताना या आरोपांवर स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले की, 'मुख्यमंत्री त्यांच्या ठरलेल्या वेळापत्रकानुसार दिल्लीला परतले, हे आरोप निराधार आहेत. मुख्यमंत्री मान यांनी 18 सप्टेंबर रोजी जर्मनीहून फ्लाइट घेतली होती, 19 सप्टेंबरला ते दिल्लीला परतले. विरोधकांनी केलेले आरोप निराधार आणि खोटा प्रचार आहे.'