पंजाबमधील तुरुंगात आता VIP सेल नसणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2022 02:09 PM2022-05-14T14:09:52+5:302022-05-14T14:44:49+5:30
Bhagwant Mann : भगवंत मान यांच्या नेतृत्वाखालील सरकारने व्हीआयपी (VIP) कल्चर संपवण्यासंदर्भात आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. यानुसार, आता पंजाबच्या (Punjab) तुरुंगातील व्हीआयपी कल्चर संपवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पंजाब : भगवंत मान (Bhagwant Mann) पंजाबचे मुख्यमंत्री झाल्यापासून एका पाठोपाठ एक मोठे निर्णय घेताना दिसत आहेत. गाण्यांमध्ये 'गन कल्चर' आणि 'गँगस्टर कल्चर' दाखवल्यावर कारवाई होईल, असा इशारा नुकताच मुख्यमंत्री भगवंत मान यांनी दिला होता. त्यानंतर आता पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या नेतृत्वाखालील सरकारने व्हीआयपी (VIP) कल्चर संपवण्यासंदर्भात आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. यानुसार, आता पंजाबच्या (Punjab) तुरुंगातील व्हीआयपी कल्चर संपवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुख्यमंत्री भगवंत मान सरकारच्या नव्या आदेशानुसार, पंजाबमधील तुरुंगांमध्ये बांधण्यात आलेले व्हीआयपी सेल पूर्णपणे बंद करण्यात येणार आहेत. दरम्यान, तुरुंगातून मोबाईल जप्त होण्याच्या वाढत्या प्रकरणांवर सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. यासाठी पंजाबमधील तुरुंगांमध्ये शोध मोहीम सुरू आहे. "आमचे सरकार स्थापन झाल्यापासून पंजाबमधील सर्व तुरुंगांतून 710 मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत", असे मुख्यमंत्री भगवंत मान म्हणाले. तसेच, "काहीही झाले तरी मी आणि आमचे सरकार यापुढे तुरुंगातून काळे धंदे सुरू होऊ देणार नाही", असेही मुख्यमंत्री भगवंत मान यांनी सांगितले.
दरम्यान, पंजाबच्या तुरुंगात तैनात असलेले वरिष्ठ अधिकारी आणि तुरुंगातील सर्व कर्मचाऱ्यांना सतत सावध केले जात आहे. दुसरीकडे, कामात हलगर्जीपणा करणाऱ्या काही अधिकाऱ्यांना आम्ही निलंबित केले आहे. सुधारगृह असो की जेल, आता खर्या अर्थाने सर्व गुन्हेगारांना सुधारू, असे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले.
पंजाबींचा आदर करा - भगवंत मान
बहुतांशी पंजाबी गाणी बंदूक आणि गुंड संस्कृतीला प्रोत्साहन देतात, त्यावर भगवंत मान यांनी नुकताच आक्षेप घेतला आहे. त्यांनी पंजाबी गायकांना इशारा दिला की, त्यांनी या गन क्लचरची जाहिरात करणे थांबवावे. तसेच गाण्यातून कोणत्याही प्रकारे द्वेष पसरवण्याचा प्रयत्न करू नये, असेही सांगितले. यासोबतच, गायकांना त्यांच्या गाण्यात पंजाब आणि पंजाबींचा आदर करण्याचे आवाहन केले. गाण्यांद्वारे हिंसेला प्रोत्साहन देणाऱ्या अशा गायकांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे मुख्यमंत्री कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.