Bhagwant Mann: पंजाब सरकारचा आणखी एक मोठा निर्णय, आमदारांना एकच पेन्शन मिळणार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2022 02:51 PM2022-03-25T14:51:24+5:302022-03-25T15:33:20+5:30
पंजाब सरकारचे अनेक मोठे निर्णय प्रस्तावित असल्याच्या बातम्या व्हायरल होत आहेत
चंडीगड - आम आदमी पक्षाचा (AAP) पंजाब विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय झाला. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Maan) यांनी सत्तेवर येताच मोठ-मोठे निर्णय घ्यायला सुरुवात केली आहे. पंजाबमध्ये 35,000 कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम स्वरुपी नोकरीवर घेण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी मंगळवारी केली. त्यानंतर, आता माजी आमदारांना केवळ एकच टर्मची पेन्शन देण्यात येणार असल्याचा निर्णयही पंजाब सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आज याची घोषणा केली.
पंजाब सरकारचे अनेक मोठे निर्णय प्रस्तावित असल्याच्या बातम्या व्हायरल होत आहेत. त्यातीलच एक मोठी बाब म्हणून पंजाबच्या माजी आमदारांची, मंत्र्यांची पेन्शन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे दावे सोशल मीडियात व्हायरल झाले होते. मात्र, आता माजी आमदारांच्या पेन्शनबाबत कोणता निर्णय घेण्यात आला, हे स्वत: पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.
''आमदार हे हात जोडून लोकांना विनंती करतात की, आम्हाला सेवा करण्याची संधी द्या. पण, सध्या 4,5 किंवा 6 वेळा आमदार बनले आहेत. जे सध्या काही कारणास्तव (तिकीट न मिळाल्याने, पराभूत झाल्याने) विधानसभेत नाहीत. त्यांना लाखो रुपयांची पेन्शन मिळते, कुणाला महिन्याला 3.5 लाख रुपये मिळतात, कुणाला 4.5 लाख, कुणाला सव्वा 5 लाख रुपयेही दरमहा पेन्शन मिळते. विशेष म्हणजे काही खासदार आहेत, जे पूर्वी आमदार होते. ते आमदार आणि खासदारकीचीही पेन्शन घेत आहेत'', त्यामुळे, पंजाब सरकारने एक मोठा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी सांगितले.
Today, we have taken another big decision. The pension formula for Punjab's MLAs will be changed. MLAs will now be eligible for only one pension.
— Bhagwant Mann (@BhagwantMann) March 25, 2022
Thousands of crores of rupees which were being spent on MLA pensions will now be used to benefit the people of Punjab. pic.twitter.com/AdeAmAnR7E
पंजाब सरकारच्या निर्णयानुसार आमदार एकदा व्हा, दोनदा व्हा, चारदा व्हा किंवा 10 वेळा आमदार व्हा. पण, आमदारकीची पेन्शन ही केवळ एक टर्मचीच मिळणार आहे. कारण, सेवा करणाऱ्यांना कुठलिही पेन्शन योग्य नाही. पंजाब सरकारच्या तिजोरीवर या पेन्शन योजनांमुळे मोठा आर्थिक भार पडत होता. त्यामुळे, केवळ 1 टर्म पेन्शनचा हा निर्णय घेण्यात आल्याचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी सांगितले. अखेर इन्कलाब झिंदाबाद.. असेही त्यांनी म्हटले.
पंजाबमधील आमदरांचं सध्याचं पेन्शन स्वरुप कसं
सध्याच्या घडीला आमदार म्हणून एकदा निवडून येणाऱ्या व्यक्तीस आयुष्यभरासाठी दरमहा ७५,१५० रुपये पेन्शन स्वरुपात मिळतात. तोच आमदार जर एक पेक्षा अधिक वेळा निवडून आला असेल, तर त्या प्रत्येक टर्मच्या पेन्शनची ६६% रक्कम त्याला दरमहा मिळते. बातमीनुसार माजी मुख्यमंत्री राजिंदर कौर भट्टल, काँग्रेस नेते लाल सिंह, माजी मंत्री सर्वन सिंह फिल्लौर यांना दरमहा ३.२५ लाख रुपये पेन्शन रक्कम म्हणून मिळतात. ज्येष्ठ नेते बीएस भुंडर यांना दरमहा २.७५ लाख रुपये तर एस एस धिंडसा यांना २.२५ लाख रुपये निवृत्ती वेतनाच्या स्वरुपात मिळत असतात.
माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल यांची विनंती
तब्बल ५ वेळा मुख्यमंत्री राहिलेले प्रकाश सिंह बादल (Parkash Singh Badal) यांनी सरकारकडे त्यांना मिळणारी पेन्शनची रक्कम लोकोपयोगी कामासाठी वापरावी अशी विनंती केलीय. त्यांना मिळणारी दरमहा रक्कम ५,७६,१५० रुपये एवढी आहे.