पंजाब : मोफत वीज देण्याच्या आश्वासनाचं काय झालं?, विरोधकांनी घेरलं; सत्ताधारी म्हणाले, "अजून तर.."
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2022 07:14 PM2022-04-04T19:14:50+5:302022-04-04T19:15:14+5:30
पंजाबमध्ये सत्तेत आल्यास ३०० युनिट मोफत वीज पुरवण्याची घोषणा आपनं निवडणुकीपूर्वी केली होती.
Punjab News : पंजाबमध्ये सत्तेत आल्यास ३०० युनिट मोफत वीज पुरवण्याची घोषणा आपनं निवडणुकीपूर्वी केली होती. आता पंजाबमध्येभगवंत मान (Bhagwant Mann) यांच्या नेतृत्वाखाली आपचं सरकार सत्तेत आलं आहे. दरम्यान, आता मोफत वीज देण्याच्या आश्वासनावरुन विरोधकांनी मान सरकारला घेरण्यास सुरूवात केली आहे.
काँग्रेस पक्षानेही भगवंत मान यांच्या सरकारवर वीजेचे दर वाढवल्याचा आरोप केला आहे. जेव्हा चरणजीत सिंग चन्नी पंजाबचे मुख्यमंत्री होते, तेव्हा राज्यातील वीजेचे दर प्रति 100 युनिटसाठी 1.19 रुपये, 101 ते 300 युनिटसाठी 4.01 रुपये आणि 301 युनिट्सच्या वर 5.76 रुपये प्रति युनिट होते, असा दावा काँग्रेसनं केला आहे. परंतु आता भगवंत मान यांच्या सरकारच्या काळात हे दर पहिल्या 100 युनिटसाठी 3.49 रुपये प्रति, 101 ते 300 पर्यंत 5.84 रुपये आणि 301 पेक्षा अधिक युनिट्ससाठी7.30 रुपये प्रति युनिट वीजेची इतके झाल्याचं काँग्रेसनं म्हटलं आहे.
याप्रकरणी भाजपनंदेखील भगवंत मान यांच्या सरकारवर प्रश्न उपस्थित केले आहेत. अरविंद केजरीवाल ज्या राज्यात भेट देतात तेथे ते खोटी आश्वासने देतात, असा आरोप भाजपने केला आहे. आम आदमी पक्षाचे सरकार आपले एकही आश्वासन पूर्ण करत नाही. केजरीवाल यांनी पंजाबमध्ये वीज मोफत देण्याचे आश्वासन दिले होते, परंतु त्यांनी ते पूर्ण केले नाही, असे विधान भाजपने केले आहे.
काय म्हणालं आप?
मात्र, वीज मोफत देण्याच्या मुद्द्यावरून आम आदमी पक्षाचे सरकार बचावाच्या भूमिकेत दिसत आहे. चमकौर साहिबमधून माजी मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांचा पराभव करणारे चरणजीत सिंग यांनी आपलं सरकार एप्रिलमध्येच 300 युनिटपर्यंत वीज मोफत देण्याचे वचन पूर्ण करणार असल्याचं सांगितलं.
"आमचे सरकार प्रत्येक आश्वासन पूर्ण करत आहे. वीज मोफत देण्याचे आश्वासन या महिन्यापासून अंमलात येणार असून प्रत्येक घरात दर महिन्याला 300 युनिट वीज मोफत दिली जाणार आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर निर्णय होणार आहे. मोफत वीज पुरवण्यासाठी आर्थिक बाबी ठरवण्यात येणार आहेत," असंही चरणजित सिंग म्हणाले.