Bhagwant Mann : मुख्यमंत्री होण्यापूर्वी भगवंत मान यांचा मोठा निर्णय; माजी मंत्र्यांची सुरक्षा काढली!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2022 14:55 IST2022-03-12T14:54:40+5:302022-03-12T14:55:21+5:30
Bhagwant Mann : भगवंत मान यांनी शनिवारी पंजाब काँग्रेसचे प्रमुख नवज्योतसिंग सिद्धू यांच्यासह जवळपास 122 नेत्यांची सुरक्षा काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे.

Bhagwant Mann : मुख्यमंत्री होण्यापूर्वी भगवंत मान यांचा मोठा निर्णय; माजी मंत्र्यांची सुरक्षा काढली!
चंदीगड : पंजाबचे (Punjab) मुख्यमंत्री (CM) होण्यापूर्वीच आम आदमी पार्टीचे नेते भगवंत मान (Bhagwant Mann) यांनी मोठा निर्णय घेतला आहे. भगवंत मान यांनी सर्व माजी मंत्री आणि आमदारांची सुरक्षा (Security) काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे. भगवंत मान यांनी शनिवारी पंजाब काँग्रेसचे प्रमुख नवज्योतसिंग सिद्धू यांच्यासह जवळपास 122 नेत्यांची सुरक्षा काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे.
मनप्रीत सिंग बादल, भारत भूषण आशु, रझिया सुलताना, परगट सिंग, राणा गुरजीत सिंग, सुखबिंदर सिंग सरकारिया, संजय तलवार, नथू राम, दर्शन लाल, धरमबीर अग्निहोत्री, अरुण नारंग, तरलोचनसिंग, नवज्योत कौर सिद्धू आणि नवज्योत सिंग सिद्धू अशी काही नावे ज्यांची सुरक्षा हटवण्यात आली आहे. या यादीनुसार राजा वडिंग यांच्याजवळ सर्वाधिक सुरक्षा आहे. दरम्यान, 369 पोलीस कर्मचारी आणि कमांडोना नेत्यांच्या सुरक्षेतून हटवण्यात येणार आहे.
वेणू प्रसाद यांची प्रधान सचिवपदी नियुक्ती
भगवंत मान यांनी त्यांच्याच पक्षाचे माजी आमदार अमरजीत सिंह यांचीही सुरक्षा काढून घेतली आहे. याशिवाय, भगवंत मान यांनी वेणू प्रसाद यांची प्रधान सचिवपदी नियुक्ती केली. ते 1991 च्या बॅचचे आयएएस आहेत.
16 मार्चला घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ
दरम्यान, पंजाब विधानसभेच्या निवडणुकीत (Punjab Assembly Election) आम आदमी पार्टीला (AAP)प्रचंड बहुमत मिळाले आहे. आम आदमी पार्टीचे नेते भगवंत मान (Bhagwant Mann) 16 मार्च रोजी पंजाबच्या (Punjab) मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. निवडणुकीपूर्वीच आम आदमी पार्टीने भगवंत मान यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले होते. निवडणुकीत आम आदमी पार्टीने 117 पैकी 92 जागा जिंकल्या आहेत. या निवडणुकीत मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी, नवज्योतसिंग सिद्धू, प्रकाशसिंग बादल आणि अमरिंदर सिंग यांच्यासह अनेक दिग्गजांचा आम आदमी पार्टीच्या उमेदवारांकडून पराभव झाला आहे.