‘राष्ट्रपतीपदासाठी भागवत उमेदवार नाहीत’
By admin | Published: May 22, 2017 04:25 AM2017-05-22T04:25:29+5:302017-05-22T04:25:29+5:30
भाजपने राष्ट्रपतीपदासाठीचा उमेदवार अद्याप ठरविलेला नाही. तसेच पक्षाने सरसंघचालक मोहन भागवत यांना
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : भाजपने राष्ट्रपतीपदासाठीचा उमेदवार अद्याप ठरविलेला नाही. तसेच पक्षाने सरसंघचालक मोहन भागवत यांना सत्ताधारी आघाडीचे उमेदवार बनविण्याचा शिवसेनेचा प्रस्तावही अमान्य केला आहे, असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी म्हटले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शहा म्हणाले की, भागवत यांना उमेदवारी देण्याचा शिवसेनेचा प्रस्ताव पक्षाने अमान्य करताना खुद्द राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने यापूर्वीच हा प्रस्ताव फेटाळला आहे. राष्ट्रपतीपदासाठी भाजपप्रणीत रालोआ उमेदवाराविषयी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना शहा यांनी याबाबत अद्याप निर्णय झाला नसल्याचे सांगितले. जर माझ्या मनात एखादे नाव असले तरीही मी याबाबत आधी पक्षात चर्चा करेन, असे ते म्हणाले. भाजपाचे हिंदूराष्ट्राचे स्वप्न साकार करण्यासाठी सरसंघचालक भागवत हेच राष्ट्रपतीपदासाठी योग्य उमेदवार ठरतील, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले होते. मात्र भाजपाचा भागवत यांना उमेदवारी देण्याचा विचार नाही, हे शहा यांच्या या विधानावरून स्पष्ट झाले.रजनीकांत यांनी राजकारण प्रवेश करण्यासाठी भाजप नेत्यांचे प्रयत्न सुरू असून रजनीकांत यांची पंतप्रधान मोदी यांच्याशी भेट घडविण्याच्या हालचालीही सुरू झाल्या आहेत. सूूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रजनीकांत हे पुढील आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्यासाठी दिल्लीला जाऊ शकतात. पुढील महिन्यात होणाऱ्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीनंतर रजनीकांत यांच्या राजकीय प्रवेशाबाबत निर्णय होऊ शकतो.
रजनीकांत मोदींना भेटणार?
तामिळ सुपरस्टार रजनीकांत यांनी भाजपामध्ये यायचे ठरविले तर त्यांचे केव्हाही स्वागतच होईल, असे सूचक विधान अमित शहा यांनी केले. मात्र राजकारणात यायचे की नाही याचा निर्णय आधी रजनीकांत यांनी स्वत: घ्यायला हवा, असे ते म्हणाले.