भागवत म्हणाले, मंदिर वही बनाएंगे; लोकांनी विचारले तारीख कब बताएंगे
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2019 05:46 PM2019-02-01T17:46:34+5:302019-02-01T17:50:00+5:30
मोहन भागवत यांनी आज राम मंदिर अयोध्येतील राम जन्मभूमीवरच बांधण्याचा पुनरुच्चार करताच उपस्थित लोकांनी मंदिर कधी बांधणार याची तारीख पण सांगा, अशा घोषणा देण्यास सुरुवात केली
प्रयागराज - कुंभमेळा सुरू असलेल्या प्रयागराज येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी आज राम मंदिर अयोध्येतील राम जन्मभूमीवरच बांधण्याचा पुनरुच्चार केला. त्यावेळी उपस्थित लोकांनी मंदिर कधी बांधणार याची तारीख सांगा, अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. त्यामुळे कार्यक्रमात गोंधळ झाला. प्रकरण आयोजक आणि उपस्थितांमध्ये हाणामारीपर्यंत गेले.
प्रयागराज येथील एका कार्यक्रमात मोहन भागवत म्हणाले की, ''रामजन्मभूमीवरच भव्य राम मंदिराची निर्मिती होईल. आता ते कसे बांधायचे हे सरकारने ठरवले पाहिजे. जर सरकारने राम मंदिराबाबत सकारात्मक पावले उचलली तर भगवान रामाचा आशीर्वाद मिळेल. राम मंदिराबाबत सरकारची भूमिका स्पष्ट आहे याची आम्हाला जाणीव आहे. तसेच राम मंदिराची निर्मिती लवकरात लवकर सुरुवात होईल, अशी अपेक्षा आहे.''
यावेळी राम मंदिरावरून आक्रमक पवित्रा घेणाऱ्यांनाही भागवत यांनी टोला लावला, ते म्हणाले. ''केवळ एकदा कार सेवा करून राम मंदिराची बांधणी पूर्ण होणार नाही. दम असेल तर कारसेवा करा आणि नसेल तर सन्मानाने माघारी फिरा. संघ मंदिर बांधणीसाठी शक्ती पणाला लावेल. अयोध्येत केवळ भव्य राम मंदिरच बनेल.''
#WATCH: Ruckus ensued after RSS chief Mohan Bhagwat's speech at the Dharm Sansad called by VHP in Prayagraj, protesters were demanding early construction of Ram temple in Ayodhya. pic.twitter.com/IGnOxThHuq
— ANI UP (@ANINewsUP) February 1, 2019
''राजकीय वर्तुळात काही घडो, राम मंदिर बांधले जावे अशी जनतेची इच्छा आहे. तीन चार महिन्यांत निर्णय झाला तर होईल. अन्यथा चार महिन्यांनंतर बांधकामाला सुरुवात होईल. सरकारने कोर्टात आपली भूमिका स्पष्ट केली आहे. '' असे मोहन भागवत यांनी सांगितले. दरम्यान, भागवत यांनी हे वाक्य उच्चारताच उपस्थितांनी मंदिर बांधणीची तारीख सांगा, अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. आयोजकांनी घोषणा देणाऱ्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. पण प्रकरण हाणामारीपर्यंत गेले.