भय्युजी महाराजांनी पत्नी- मुलीच्या नव्हे तर 'या' व्यक्तीकडे दिले आर्थिक संपत्तीचे अधिकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 10:54 AM2018-06-13T10:54:54+5:302018-06-13T13:33:14+5:30
आत्महत्येपूर्वीच्या चिठ्ठीत त्यांनी आपण जीवनाला कंटाळल्याचे म्हटले होते.
इंदूर: अध्यात्मिक गुरु भय्युजी महाराजांनी आत्महत्येपूर्वी आपल्याकडील आर्थिक संपत्तीचे अधिकार कुटुंबीयांना नव्हे तर आपल्या सेवकाला नावावर केल्याचे समोर आले आहे. 'न्यूज 18' च्या वृत्तानुसार, भय्युजी महाराजांनी आपल्या आर्थिक संपत्तीचे अधिकारी पत्नी किंवा मुलीच्या नावावर नव्हे तर त्यांचा सर्वात विश्वासू अनुयायी विनायककडे दिले आहेत. ही बातमी ऐकून अनेकजण आश्चर्य व्यक्त करत आहे. भय्युजी महाराजांनी असा निर्णय का घेतला असावा, याबद्दल निरनिराळे तर्कवितर्क लढवले जात आहेत.
आत्महत्येपूर्वीच्या चिठ्ठीत त्यांनी आपण जीवनाला कंटाळल्याचे म्हटले होते. कोणीतरी कुटुंबाची जबाबदारी स्वीकारा. मी आता खचलोय. मी आता जात आहे, असे त्यांनी म्हटले होते. परंतु, माझ्या आत्महत्येसाठी कोणालाही जबाबदार धरू नये, असेही त्यांनी चिठ्ठीत सांगितले होते.
दरम्यान, आज भय्युजी महाराजांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. अनुयायांना सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत सुर्योद्य आश्रमात भय्यू महाराज यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेता येईल. दुपारी दीड वाजता अंतिम यात्रेला सुरुवात होणार आहे. त्यानंतर अडीच वाजता इंदूरमधील मेघदूत मुक्तिधाम येथे अंत्यसंस्कार केले जातील. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, सांस्कृतिक तसेच करमणूक क्षेत्रातील मंडळींचा भय्युजी महाराजांशी संबंध होता. त्यांचा सल्ला व आशीर्वाद घेण्यासाठी या क्षेत्रातील मंडळी नेहमी त्यांच्याकडे जात. मात्र, दोन महिन्यांपूर्वी त्यांनी अध्यात्म व सामाजिक कार्यातून निवृत्ती घेतली होती.