Bhaiyyuji Maharaj suicide : देहविक्रय करणा-या महिलांच्या 51 मुलांना दिले होते स्वतःचे नाव
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2018 04:15 PM2018-06-12T16:15:52+5:302018-06-12T16:15:52+5:30
भय्यूजी महाराज यांनी मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रात सामाजिक बांधिलकी जोपासली होती. महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरमधील देहविक्रय करणा-या 51 मुलांचे वडील म्हणून त्यांनी स्वतःचे नाव दिले होते.
मुंबई : अध्यात्मिक गुरु भय्यूजी महाराज यांनी मंगळवारी आत्महत्या केली. इंदूरमधील सिल्वर स्प्रिंग या त्यांच्या निवासस्थानी त्यांनी स्वत:वर गोळी झाडून स्वत:च जीवन संपविले. कौटुंबिक कारणांमुळे त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती मिळते आहे.
भय्यूजी महाराज यांनी मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रात सामाजिक बांधिलकी जोपासली होती. महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरमधील देहविक्रय करणा-या 51 मुलांचे वडील म्हणून त्यांनी स्वतःचे नाव दिले होते. त्यासोबतच, बुलडाण्यातील खामगाव जिल्ह्यात आदिवासींच्या 700 मुलांसाठी त्यांनी शाळा उभारली होती. तसेच, शाळेच्या स्थापनेआधी त्यांनी पार्धी जमातीच्या लोकांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न केला होता.यासोबतच, त्यांच्या ट्रस्टने जवळपास 10 हजार मुलांना आतापर्यंत स्कॉलशिप दिली आहे.
महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात त्यांची अनेक आश्रम आहेत. भय्यूजी महाराज हे ग्लोबल वॉर्मिंगनेही चिंतीत होते. त्यामुळे गुरुदक्षिणेच्या नावाखाली ते झाडे लावण्याचा सल्ला द्यायचे. आतापर्यंत त्यांनी 18 लाख झाडे लावली आहेत. देवास आणि धार या आदिवासी जिल्ह्यांत त्यांनी जवळपास 1 हजार तलाव खोदले होते.