झारखंड निर्मितीसाठी झटलेला नेता आज विकतोय भाजीपाला
By admin | Published: February 6, 2017 12:49 AM2017-02-06T00:49:58+5:302017-02-06T00:49:58+5:30
झारखंड हे स्वतंत्र राज्य व्हावे यासाठी १९८० ते १९९० या दशकात आघाडीवर राहून चळवळ करून बंद आणि निदर्शने या दरम्यान अनेकवेळा तुरुंगात गेलेले विनोद भगत
रांची : झारखंड हे स्वतंत्र राज्य व्हावे यासाठी १९८० ते १९९० या दशकात आघाडीवर राहून चळवळ करून बंद आणि निदर्शने या दरम्यान अनेकवेळा तुरुंगात गेलेले विनोद भगत (५५) आज मोरहाबदी येथे रस्त्यावर भाजी विकून पोट भरत आहेत.
चळवळ आणि आंदोलनानंतर बिहार राज्यातून झारखंड वेगळे काढून त्याला स्वतंत्र राज्याचा दर्जा दिला गेला त्याला आता १७ वर्षे झाली. विनोद भगत हे अखिल झारखंड स्टुडंट्स युनियनचे संस्थापक सदस्य. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कठीण आर्थिक परिस्थितीमध्ये जसा चहा विकावा लागला तसे मी मोरहाबदी गावात आंत्यतिक दारिद्र्यामुळे भाजी विकत आहे, असे भगत यांनी सांगितले. माझ्या आयुष्यातील हा वाईट काळ असून तो लवकरच निघून जाईल, अशी त्यांना आशा आहे.
झारखंडला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळण्यासाठी १९८६ मध्ये मी माझी नोकरी सोडून चळवळीत सक्रिय झालो. राज्य मग लबाड, लुच्च्या लोकांच्या हाती जाईल याची मला तेव्हा कल्पना नव्हती, अशी खंत बिनोद भगत यांनी बोलून दाखवली.
१९९५ मध्ये स्थापन झालेल्या झारखंड भाग स्वायत्त परिषदेचे विनोद भगत हेदेखील सदस्य होते. भगत यांनी रांची विद्यापीठातून अर्थशास्त्र आणि पत्रकारितेमध्ये दोन दोन पदव्या मिळवलेल्या आहेत.
नंतर ते दक्षिण पूर्व रेल्वेमध्ये धनबादला असिस्टंट स्टेशन मॅनेजर होते. त्यांना राजकीय (झारखंड मुक्ती मोर्चा आणि भाजप) पक्षांशी जुळवून न घेता आल्यामुळे ते मग विस्मृतीमध्ये गेले.