घरात शौचालय नसल्यास नाही मिळणार भाजी - मध्य प्रदेशातील अनोखा उपक्रम
By Admin | Published: March 16, 2016 10:24 AM2016-03-16T10:24:17+5:302016-03-16T10:46:32+5:30
मध्य प्रदेशातील रतलाममधील एका गावातील नागरिकांनी उघड्यावर शौचास जाणा-यांना दैनंदिन गरजेच्या वस्तू वा सुविधा देणे बंद केले आहे.
ऑनलाइन लोकमत
भोपाळ, दि. १६ - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वच्छ भारत अभियानाचा परिणाम हळूहळू संपूर्ण देशभरात, गावा-गावात जाणवायला लागला आहे. मध्य प्रदेशातील रतलाममधील एका गावातील नागरिकांनी तर उघड्यावर शौचास जाणा-यांना दैनंदिन गरजेच्या वस्तू वा सुविधा देणे बंद केले आहे. रतलामच्या भुटेडा गावात ज्यांच्या घरात शौचालय नसेल वा जे उघड्यावर शौच करण्यास जात असतील अशा लोकांना गावातील व्यावसायिकांनी भाजी विकणे, केस कापणे अशा सेवा देण्यास नकार दिला आहे.
काही दिवसांपूर्वी मी 'स्वच्छ भारत अभियान' मोहिमेच्या एका सत्रात सहभागी झालो होतो. उघड्यावर शौचाला जाणे ही फक्त वाईट सवय नसून त्यामुळे आरोग्यावरही वाईट परिणाम होतो, हे मी गावक-यांना समजावून सांगितले. त्यानंतर गावक-यांनी स्वत:हून पुढाकार घेत अनेक योजना राबवण्याचा विचार सुरू केला' असे या कल्पनेचा जनक असलेल्या लोकेश शर्माने सांगितले. त्याची ही कल्पना पटून अनेक गावक-यांनी त्याची साथ दिली ज्यामध्ये धीरूभाई हे भाजी विक्रेते आणि गावातील एकमेव न्हावी अमरू लाल सेन यांचा समावेश आहे.
त्यानुसार ' उघड्यावर शौचाला जाणारी एखादी व्यक्ती माझ्या दुकानात आल्यास मी त्याची दाढी करण्यास वा त्याच्या कुटुंबियांचे केस कापून देण्यास नम्रपणे पम स्पष्ट शब्दांत नकार देतो' असे अमरू लाल सेन यांनी सांगितले. ' मात्र मी त्या नागरिकातची समजूत काढतो आणि त्याने घरात शौचालय बांधून त्याचा उपयोग करण्यास सुरूवात केल्यास तो माझ्या दुकानात आल्यावर मी त्याला एकदा मोफत सेवा देईन अशी ऑफर त्याला देतो' असेही त्यांनी नमूद केले.