Bhagwant Mann : भगवंत मान यांच्यावर रोड शोदरम्यान दगडफेक; डोक्याला दुखापत
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2022 07:42 PM2022-02-11T19:42:01+5:302022-02-11T19:42:58+5:30
Punjab Election 2022 : रुग्णालयात उपचार झाल्यानंतर त्यांनी पुन्हा प्रचार सुरू केला असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
चंदीगड : पंजाब विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी रंगली आहे. निवडणूक प्रचारादरम्यान एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यातच आम आदमी पार्टीचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार भगवंत मान (Bhagwant Mann) यांच्यावर रोड शो दरम्यान हल्ला करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. अमृतसर येथील अटारी भागातून भगवंत मान यांचा ताफा जात असतानाच लोक स्वागत करण्यासाठी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करत होते. त्यावेळी अज्ञाताकडून त्यांच्यावर दगड भिरकावण्यात आला. यात ते जखमी झाले आहेत.
भगवंत मान हे शुक्रवारी अमृतसर जिल्ह्यातील आपच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आले होते. दुपारी अमृतसर-अटारी मार्गावर त्यांचा रोड शो होता. या रोड शो साठी मोठी गर्दी झाली होती. रस्त्याच्या दुतर्फाही मोठ्या संख्येने समर्थक उभे होते. कारचा सनरूफ उघडून भगवंत मान हे उभे राहिले होते व लोकांना अभिवादन करत ते पुढे चालले होते. लोक स्वागत करण्यासाठी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करत होते. त्याचवेळी गर्दीतून अज्ञात व्यक्तीकडून त्यांच्यावर दगड फेकण्यात आला. त्यात ते जखमी झाले. या घटनेनंतर उपचारांसाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात उपचार झाल्यानंतर त्यांनी पुन्हा प्रचार सुरू केला असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
दरम्यान, पंजाबमधील सर्व जागांसाठी 20 फेब्रुवारीला मतदान होणार आहे, तर निकाल 10 मार्चला लागणार आहेत. आम आदमी पार्टीकडून भगवंत मान यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून पंजाब विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरवले आहे. आम आदमी पार्टीने लोकांची मते मागवून त्यानुसार हा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची घोषणा आम आदमी पार्टीचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली होती. दरम्यान, भगवंत मान हे पंजाबमधील संगरूर येथून दोनवेळा लोकसभेवर निवडून गेले आहेत.