"भारत आटा"... नागरिकांना स्वस्तात मिळणार गव्हाचं पीठ, एक किलोसाठी एवढा दर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2023 05:53 PM2023-11-01T17:53:56+5:302023-11-01T17:54:41+5:30
स्वस्त धान्य दुकानातून नागरिकांना स्वस्तात गहू, तांदूळ यांसह धान्याचा पुरवठा केला जातो.
नवी दिल्ली - महागाईने सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाला असून यंदाच्या वर्षी सुरुवातीपासूनच गव्हाच्या किंमतीत वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. जेव्हा गहू शेतातून बाजारात येऊ लागला, तेव्हात अनब्रँडेड आटा (गव्हाचं पीठ) ३० रुपये किलो दरावर विकले जात होते. त्यानंतर, काही दिवसांताच गव्हाच्या पीठाची किंमत ३५ रुपये किलोपर्यंत पोहोचली आहे. त्यातच, ब्रँडेड कंपनीच्या आट्याचा विचार केल्यास तो आटा प्रति किलो ४० ते ५० रुपये किलोने विकला जात आहे. त्यामुळे, सर्वसामान्य नागरिकांना आता आयत्या पीठाच्या दरवाढीपासून दिलासा देण्यासाठी सरकारने स्वस्तातील आटा देण्याचं नियोजन केलं आहे.
स्वस्त धान्य दुकानातून नागरिकांना स्वस्तात गहू, तांदूळ यांसह धान्याचा पुरवठा केला जातो. आता, सरकारने गव्हाचं पीठ म्हणजे थेट आटाच स्वस्तात उपलब्ध करुन देण्याचं नियोजन केलं आहे. विशेष म्हणजे दिवाळीपूर्वीच, ७ तारखेपासून नागरिकांना हा आटा मिळण्याची शक्यता आहे. केंद्रीय ग्राहक विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, भारत ब्रँड या नावाने सरकारी आटा विक्री केला जाईल. ग्राहकांना २७.५ रुपये प्रति किलो दराने हा आटा मिळणार आहे. दरम्यान, यावर अद्यापही वरिष्ठ स्तरावर सखोल चर्चा आणि योजनात्मक काम सुरू आहे.
राष्ट्रीय ग्राहक सहकारी संघास (NCCF) नोडल एजन्सी बनवण्यात येऊ शकते. भारत ब्रँडच्या आट्यासाठी भारतीय खाद्य महामंडळ (FCI) सेंट्रल पूलकडून अडीच लाख किलो गहू अलॉट करण्यात येत आहे. या गव्हाचे दळण करुन १० ते ३० किलोचे पॅकेज बनवण्यात येतील.
भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपनण म्हणजेच नाफेड, राष्ट्रीय ग्राहक सहकारी संघ, केंद्रीय भांडार आणि धान्य दुकांनातून हा आटा वितरण केला जाईल. या व्यवस्थांच्या माध्यमातून राज्य सरकारला स्वस्तातील आटा विविध कल्याणकारी योजनांसाठी, पोलीस, कामगारांच्या पूर्ततेसाठी आणि राज्य सरकारच्या नियंत्रणातील सहकारी समित्या आणि स्वस्त धान्य दुकानातून वितरण करण्यात येईल. त्यामुळे, लवकरच भारत ब्रँडचा आटा ग्राहकांसाठी उपलब्ध होणार आहे.