आई विनवण्या करत असतानाही आंदोलकांनी रुग्णवाहिका अडवली, बाळाने कुशीतच सोडले प्राण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2018 11:28 AM2018-04-03T11:28:57+5:302018-04-03T11:34:26+5:30
एके ठिकाणी बाळाला घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेला आंदोलकांनी घेरले.
नवी दिल्ली: दलित अत्याचारविरोधी कायद्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात सोमवारी अनेक दलित संघटना सोमवारी रस्त्यावर उतरल्या होत्या. त्यांनी पुकारलेल्या ‘भारत बंद’ला अनेक ठिकाणी हिंसक वळण लागले. याचा सर्वाधिक फटका बिहार आणि उत्तर प्रदेश या भागात बसला. अनेक ठिकाणी रस्त्यावर उतरलेला जमाव हिंसक झाला होता. यामुळे एका नवजात बालकाचा उपचारांअभावी मृत्यू झाला. जन्माला आल्यानंतर या अर्भकाची प्रकृती खालावल्याने त्याला उपचारांसाठी हाजीपूर येथील रुग्णालयात नेले जात होते.
मात्र, यावेळी रस्त्यावर आंदोलकांकडून जाळपोळ सुरू होती. या आंदोलकांनी रस्त्यावर टायर्स आणि इतर वस्तू टाकून रस्त्यावर अडथळे निर्माण केले होते. एके ठिकाणी बाळाला घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेला आंदोलकांनी घेरले. यापैकी काही आंदोलकांनी रुग्णवाहिकेवर काठ्यांनी हल्लाही चढवला. यावेळी बाळाची आईने आंदोलनकर्त्यांना आम्हाला रुग्णालयात जाऊन द्या, अशी विनवणीही केली. मात्र, कोणीही तिचे म्हणणे ऐकून घेतले नाही. या आंदोलकर्त्यांनी रुग्णवाहिकेचा रस्ता तसाच रोखून धरला. त्यामुळे उपचारांअभावी नवजात अर्भकाने आईच्या कुशीतच आपला प्राण सोडला. या घटनेनंतर आईच्या चेहऱ्यावर एकीकडे बाळ गमावल्याची यातना दिसत होती तर दुसरीकडे आंदोलकांबद्दल मनात प्रचंड चीडही होती. हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
भारत बंद आंदोलनाच्यावेळी झालेल्या हिंसाचारात ९ जण ठार झाले. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार आणि पंजाबनंतर महाराष्ट्रातही काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी नागरिकांना शांततेचे आवाहन केले आहे. कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी स्पष्ट केले आहे की, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाशी सरकार सहमत नाही. या निर्णयाचा व्यापक आढावा घेण्यासाठी सरकारने याचिका दाखल केलेली आहे.