Bharat Bandh: आरक्षणविरोधी आंदोलनाला हिंसक वळण; अनेक भागांमध्ये जाळपोळीच्या घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2018 12:32 PM2018-04-10T12:32:53+5:302018-04-10T14:25:59+5:30
आरक्षण समर्थक आणि विरोधक भिडल्यानं तणाव
पाटणा: शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमधील जातीवर आधारित आरक्षणाविरोधात देण्यात आलेल्या भारत बंदच्या हाकेला बिहारमध्ये हिंसक वळण लागले आहे. बिहारमधील अनेक जिल्ह्यांमध्ये हिंसाचार झाला आहे. अनेक भागांमध्ये लोक रस्त्यावर उतरले आहेत. काही ठिकाणी हिंसक झालेल्या जनसमुदायाने जाळपोळदेखील केली आहे. राजगीरहून दिल्लीला जाणारी श्रमजीवी एक्स्प्रेस आंदोलकांनी आरा भागात रोखली आहे. आणखीही अनेक ठिकाणी एक्स्प्रेस गाड्या अडवण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत.
आरामध्ये जातीय आरक्षणाचे समर्थक आणि विरोधक आमनेसामने आले. यावेळी गोळीबारही झाला. त्यामध्ये ६-७ पोलीस कर्मचारी जखमी झाले. याशिवाय आरा-बक्सर रस्त्यावरही आंदोलन सुरु आहे. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. हिंसाचाराच्या घटनांनंतर आरामध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. आरक्षणाविरोधात करण्यात आलेल्या आंदोलनात सहभागी झालेल्या काही तरुणांनी बिहारच्या भोजपूरमध्ये रस्ता रोखला आहे. याशिवाय अनेक ठिकाणी जाळपोळदेखील झाली आहे. कैमूर जिल्ह्यातील नॅशनल हायवे २१९ वर आंदोलक तरुणांनी आरक्षणाविरोधात जोरदार घोषणाबाजी करुन हायवे रोखला आहे. मुझफ्फरपूरमध्येही पाटणा हायवे रोखण्यात आला आहे.
अॅट्रॉसिटी कायद्यात सर्वोच्च न्यायालयाने सुचवलेल्या बदलांविरोधात २ एप्रिल रोजी दलित संघटनांनी भारत बंदची हाक दिली होती. या भारत बंद दरम्यान उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये हिंसाचार झाला होता. याच बंदला उत्तर म्हणून जातीवर आधारित आरक्षणाविरोधात काही संघटनांनी आज भारत बंदची हाक दिली. त्या पार्श्वभूमीवर राजस्थान, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागात सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात आली. अधिकृतपणे कोणत्याही मोठ्या संघटनेकडून जाहीरपणे भारत बंदची हाक देण्यात आलेली नाही. मात्र तरीही सोशल मीडियाच्या माध्यमातून भारत बंदचे मेसेज मोठ्या संख्येने पसरवण्यात आले होते.