Bharat Bandh: भारत बंदचा आज दूसरा दिवस; पहिल्या दिवशी अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2022 08:26 AM2022-03-29T08:26:08+5:302022-03-29T08:26:20+5:30
केंद्रीय कामगार संघटनांनी पुकारलेल्या संपाचा मात्र आरोग्यसेवा आणि इंधन पुरवठा यासारख्या अत्यावश्यक सेवांवर कोणताही परिणाम झाला नाही.
केंद्रीय कामगार संघटनांनी सोमवारपासून दोन दिवसीय देशव्यापी संप पुकारले आहे. आज संपाचा दूसरा दिवस असून सोमवारी पहिल्या दिवशी भारत बंदमुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले होते. केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात हजारो कामगारांच्या दोन दिवसीय देशव्यापी संपाच्या पहिल्या दिवशी सोमवारी पश्चिम बंगाल, केरळ आणि तामिळनाडू सारख्या राज्यांतील अनेक सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये सार्वजनिक वाहतूक सेवा ठप्प झाली होती.
केंद्रीय कामगार संघटनांनी पुकारलेल्या संपाचा मात्र आरोग्यसेवा आणि इंधन पुरवठा यासारख्या अत्यावश्यक सेवांवर कोणताही परिणाम झाला नाही. सरकारी कार्यालयांसह शैक्षणिक संस्थांमध्ये त्याचा परिणाम नगण्य होता. काही बँक शाखांमध्ये, विशेषत: मजबूत ट्रेड युनियन चळवळ असलेल्या शहरांमध्ये, 'ओव्हर-द-काउंटर' सार्वजनिक व्यवहार मर्यादित ठेवण्यात आले होते.
केंद्रीय कामगार संघटनांच्या संयुक्त मंचाने सांगितले की, केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांचा निषेध करण्यासाठी देशव्यापी संपामुळे किमान आठ राज्यांमध्ये बंदची परिस्थिती निर्माण झाली. संयुक्त मंचाने सांगितले की, तामिळनाडू, केरळ, पुद्दुचेरी, आंध्र प्रदेश, तेलंगणा, ओदिशा, आसाम, हरियाणा आणि झारखंडमध्ये बंदसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.
राज्यातील ६५ टक्के वीज कर्मचाऱ्यांनी भारत बंदमध्ये सहभाग घेतला. केवळ ३५ टक्केच कर्मचारी कामावर पोहोचले होते. मुख्य वीजप्रवाहात तांत्रिक सध्या सर्व यंत्रणा सुरळीत सुरू असल्यामुळे काही अडचण नाही. मात्र अडचण आली तर याचा राज्यभरातील जनतेवर मोठा परिणाम दिसणार आहे. वीज कर्मचारी संपावर गेले असतानाच उर्जामंत्री नितीन राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. तसेच हा संप कर्मचाऱ्यांनी त्वरित मागे घ्यावा असे आवाहन केले आहे.