बूस्टर डोसच्या तयारीत भारत बायोटेक, नेझल व्हॅक्सिनच्या तिसऱ्या क्लिनिकल चाचणीसाठी मागितली परवानगी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2021 06:55 PM2021-12-20T18:55:34+5:302021-12-20T18:56:30+5:30
intranasal COVID vaccine : या लसीची सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, नाकातून दिली जाणारी ही लस (नेझल व्हॅक्सिन) त्या सर्व लोकांना दिली जाऊ शकते, ज्यांना कोवॅक्सिन आणि कोविशील्ड यापैकी एक लस मिळाली आहे.
नवी दिल्ली : भारत बायोटेकने (Bharat Biotech) नाकाद्वारे दिल्या जाणाऱ्या कोरोना लसीच्या (Intranasal Covid Vaccine) बुस्टर डोसच्या तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल चाचणीसाठी (Clinical Trial) डीसीजीआयकडे (DCGI) अर्ज पाठवला आहे. वृत्तसंस्था एएनआयने सोमवारी आपल्या सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली.
या लसीची सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, नाकातून दिली जाणारी ही लस (नेझल व्हॅक्सिन) त्या सर्व लोकांना दिली जाऊ शकते, ज्यांना कोवॅक्सिन आणि कोविशील्ड यापैकी एक लस मिळाली आहे. भारत बायोटेकचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक कृष्णा एल्ला यांनी 10 नोव्हेंबर रोजी नवी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात नाकातून दिल्या जाणाऱ्या लसीच्या महत्त्वावर भर दिला. यासोबतच बूस्टर डोसच्या संदर्भात ते म्हणाले की, कोरोना लसीचा दुसरा डोस दिल्यानंतर सहा महिन्यांनीच तिसरा डोस द्यावा, हीच सर्वात योग्य वेळ आहे.
Bharat Biotech has submitted phase 3 clinical trial application to DCGI for its booster dose of their intranasal Covid vaccine that can be given to Covaxin and Covishield vaccinated people: Source pic.twitter.com/Sao0TMvMcj
— ANI (@ANI) December 20, 2021
'नेझल व्हॅक्सिन' किती महत्त्वाची आहे?
संपूर्ण जगाला अशा प्रकारच्या लसी हव्या आहेत, असे 'नेझल व्हॅक्सिन'च्या महत्त्वाबाबत कृष्णा एल्ला यांनी सांगितेले होते. ते म्हणाले होते की, संक्रमण थांबवण्याचा हा एकमेव मार्ग आहे. प्रत्येकजण 'इम्युनोलॉजी' शोधण्याचा प्रयत्न करत आहे आणि सुदैवाने, भारत बायोटेकने ते शोधून काढले आहे. तसेच, आम्ही नाकाद्वारे देण्यात येणारी लस आणत आहोत. कोवॅक्सिनचा दुसरा डोस नाकातून देता येतो का, हे आम्ही पाहत आहोत, हे धोरणात्मक, वैज्ञानिकदृष्ट्याही खूप महत्त्वाचे आहे. कारण जर तुम्ही नाकातून दुसरा डोस दिला तर तुम्ही संसर्ग पसरण्यापासून रोखू शकता, असे कृष्णा एल्ला यांनी म्हटले होते.