अमेरिकेतील संस्थेशी भारत बायोटेकचा लसीसाठी करार; १ अब्ज डोस बनविणार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2020 03:18 AM2020-09-24T03:18:05+5:302020-09-24T03:19:06+5:30
लस विकसित करण्यात यश मिळाल्यास तिचे उत्पादन करण्याचे व अमेरिका, जपान, युरोप वगळता अन्य देशांत या लसीची विक्री करण्याचे अधिकार भारत बायोटेकला मिळाले आहेत.
नवी दिल्ली : अमेरिकेतल्या सेंट लुईस येथील वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिन (डब्ल्यूयूएसएम) ही संस्था विकसित करीत असलेल्या व नाकावाटे द्यावयाच्या कोरोना प्रतिबंधक लसीच्या भारतातील मानवी चाचण्यांसाठी व उत्पादनाकरिता भारत बायोटेकने करार केला आहे.
ही लस विकसित करण्यात यश मिळाल्यास तिचे उत्पादन करण्याचे व अमेरिका, जपान, युरोप वगळता अन्य देशांत या लसीची विक्री करण्याचे अधिकार भारत बायोटेकला मिळाले आहेत. लसीच्या चाचण्यांचा पहिला टप्पा डब्ल्यूयूएसएमच्या अमेरिकेतील प्रयोगशाळेत झाला. मानवी चाचण्यांच्या दुसऱ्या व तिसºया टप्प्याचे प्रयोग आपल्या देशात करण्यासाठी बायोेटेकने केंद्राकडे परवानगी मागितली. नाकावाटे द्यायची लस बनविणे सोपे काम नाही; पण अशी लस विकसित करता आली तर त्यामुळे इंजेक्शन, सुई आदी साहित्य इतर लसींसाठी लागते ते या लसीकरिता लागणार नाही. भारत बायोटेकचे अध्यक्ष कृष्णा इल्ला यांनी सांगितले की, नाकावाटे द्यायची ही लस विकसित करण्यात यश आले तर तिचे १ अब्ज डोस आम्ही तयार करू.
अस्ट्राझेनेकाच्या लसीची अमेरिकेत चाचणी थांबलेलीच
न्यूयॉर्क : अस्ट्राझेनेका पीएलसीच्या कोरोनावरील लसीची चाचणी अमेरिकेत थांबलेलीच आहे, असे आरोग्य व मानवीसेवा मंत्री अलेक्स अझर यांनी सांगितले. तर अमेरिकेचा एफडीए जागतिक चाचणीवेळी रुग्णाला कोणता आजार झाला, या आजाराची चौकशी करीत आहे. अझर यांनी सांगितले की, अमेरिकेत एफडीएकडून चौकशी सुरू असली तरी अमेरिकेच्या बाहेर मात्र याच्या चाचण्या सुरू आहेत. याचा अर्थ लस सुरक्षित असावी, यासाठी सर्वांचे प्रयत्न आहेत.