Bharat Gold Mines: बंद होणार देशातील सर्वात मोठी 'भारत गोल्ड माइन्स', याच ठिकाणी झाली KGF-2ची शूटिंग
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2022 07:03 PM2022-05-25T19:03:31+5:302022-05-25T19:12:23+5:30
Bharat Gold Mines: केंद्र सरकारने भारत गोल्ड मायनिंग लिमिटेडला बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याला कोलार गोल्ड फील्ड नावानेही ओळखले जाते.
Bharat Gold Mines: केंद्रीय मंत्रिमंडळाने भारत गोल्ड मायनिंग लिमिटेड (BGML) बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सूत्रांकडून ही माहिती मिळाली आहे. भारत गोल्ड माईन्स लिमिटेड हा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम असून, एप्रिल 1972 मध्ये खाण विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली याला समाविष्ट केले गेले होते. ही खाण कोलार गोल्ड फील्ड (KGF) म्हणूनही ओळखला जातो. या KGFच्या पार्श्वभूमीवर बनवलेल्या KGF या चित्रपटाने देश-विदेशात चांगलीच प्रसिद्धी मिळवली आहे. 1900 च्या पहिल्या दशकात येथे सोन्याचे उत्पादन झाल्याचे सांगितले जाते. त्यावेळी भारतातील 95 टक्के सोन्याचे उत्पादन केजीएफमधून होत असे.
2006 मध्ये केंद्र सरकारने जागतिक निविदेद्वारे मालमत्तेची विल्हेवाट लावण्याचा निर्णय घेतला होता. परंतु वेळ निघून गेल्याने, विविध बदल आणि समस्यांमुळे मंत्रिमंडळाच्या निर्णयाची अंमलबजावणी होऊ शकली नाही. मात्र, कंपनी बंद झाल्यानंतर तिचे पुनरुज्जीवन करण्याची मागणी होत आहे. अनेक राज्ये आणि केंद्रीय मंत्रीही कंपनी पुन्हा सुरू करण्यासाठी आग्रही आहेत. मात्र, यासाठी कोणताही प्रस्ताव नसल्याचे केंद्राने 2021 मध्ये स्पष्ट केले आहे.
2001 पासून कामकाज बंद केले
कोणताही प्रस्ताव नसल्याचे केंद्रीय कोळसा आणि संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी स्पष्ट केले. लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, "भारत गोल्ड माइन्स लिमिटेड हा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम एप्रिल, 1972 मध्ये पूर्वीच्या खाण विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली KGF येथे कार्यालयासह समाविष्ट करण्यात आला होता. यात प्रामुख्याने सोन्याचे खाणकाम करण्यासाठी KGF आणि आंध्र प्रदेशातील काही ठिकाणी काम व्हायचे. त्याचे ऑपरेशन आर्थिकदृष्ट्या अव्यवहार्य बनल्यामुळे, 12 जून 2000 रोजी ते बंद करण्याचे आदेश जारी करण्यात आले. 1 मार्च 2001 पासून बीजीएमएलचे कामकाज बंद करण्यात आले.