'भारत माता की जय' म्हटलंच पाहिजे, विधानावरुन काँग्रेसची मुख्यमंत्र्यांवर टीका
By admin | Published: April 3, 2016 12:58 PM2016-04-03T12:58:04+5:302016-04-03T15:02:47+5:30
'भारत माता की जय' म्हटलेच पाहिजे या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानावर काँग्रेस आणि मुस्लिम धार्मिक नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३ - या देशात रहायचे असेल तर, प्रत्येक भारतीयाने 'भारत माता की जय' म्हटलेच पाहिजे या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानावर काँग्रेस आणि मुस्लिम धार्मिक नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. शनिवारी नाशिकमध्ये भाजपच्या एका कार्यक्रमामध्ये बोलताना मुख्यमंत्र्यांनी काही लोक 'भारत माता की जय' म्हणणार नाही अस म्हणतात मग, काय पाकिस्तान की जय, चायना की जय म्हणणार असे विधान केले होते.
काँग्रेस नेते संदीप दिक्षित यांनी फडणवीस आणि भाजपवर राजकीय फायद्यासाठी 'भारत मात की जय' या घोषणेचा उपयोग करत असल्याचा आरोप केला आहे. 'भारत माता की जय' ही घोषणाच मूळात वादाचा मुद्दा होऊ शकत नाही. पण भाजप याला वादाचा विषय बनवून आपण किती राष्ट्रवादी आणि देशभक्त आहोत ते दाखवण्याचा प्रयत्न करत आहे.
भाजप आणि त्यांच्या पूर्वजांनी भारताच्या स्वातंत्र्यलढयात कोणतेही योगदान दिलेले नाही. यांच्या नेत्यांना एकदा तुरुंगवास झाला होता मात्र त्यांनी माफीनामा लिहून दिला होता असा आरोप काँग्रेस नेते संदीप दिक्षित यांनी केला.
अखिल भारतीय इमाम संघटनेचे मुख्य इमाम उमर अहमद इलियासी यांनीही देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. जे जबाबदारीच्या पदावर आहेत त्यांनी अशी विधाने करणे टाळले पाहिजे. कोणी या देशात रहावे, कोणी राहू नये हे ठरवण्याचा अधिकार कोणाकडेही नाही. जर तुम्ही लोकांवर 'भारत माता की जय' घोषणा देण्यासाठी जबरदस्ती केली तर, त्यामुळे तिरस्कार, व्देष वाढले असे इलियासी यांनी सांगितले.