मराठवाड्याच्या भूमिपुत्राला ‘भारतरत्न’ सन्मान
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2019 04:34 AM2019-01-26T04:34:02+5:302019-01-26T04:34:22+5:30
‘भारतरत्न’ हा सर्वोच्च सन्मान मिळालेले चंडिकादास अमृतराव देशमुख उपाख्य नानाजी देशमुख यांचे महाराष्ट्राच्या मातीशी खूप जुने ऋणानुबंध होते.
- नंदकिशोर पाटील
‘भारतरत्न’ हा सर्वोच्च सन्मान मिळालेले चंडिकादास अमृतराव देशमुख उपाख्य नानाजी देशमुख यांचे महाराष्ट्राच्या मातीशी खूप जुने ऋणानुबंध होते. नानाजींची कर्मभूमी राजस्थान आणि उत्तर प्रदेश असली तरी त्यांची जन्मभूमी महाराष्ट्र आहे, हे अनेकांना माहिती नसेल. मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यातील कडोली या छोट्याशा गावी नानांजींचा (११ ऑक्टोबर १९१६) जन्म झाला. घरची आर्थिक परिस्थिती बेताची. त्यात लहानपणीच मातृपितृ छत्र हरपलेले. भाजी विकून आणि मंदिरात राहून त्यांनी शिक्षण पूर्ण केले. उच्च शिक्षणासाठी त्यांची बिर्ला इंस्टीट्यूट या नामांकित संस्थेत निवड झाली आणि त्यांचे जीवनच बदलून गेले.
स्वालंबन, स्वयंशिस्त आणि संस्कार हे त्रिगुण अंगी असलेले नानाजी उच्च शिक्षण पूर्ण करताच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यात सामील झाले. नानाजींची मेहनत, राष्ट्रीय विचार आणि समाजसेवेची आवड बघून सरसंघचालक डॉ. केशव बळिराम हेडगेवार यांनी त्यांच्यावर प्रान्त प्रचारक म्हणून उत्तर प्रदेशाची जबाबदारी सोपविली. लोकमान्य टिळकांच्या राष्ट्रवादी विचारांनी पे्ररित झालेल्या नानाजींनी सामाजिक कार्याचा यज्ञच सुरू केला. १९४० मध्ये डॉ. हेडगेवार यांच्या निधनानंतर नानाजींवर महाराष्ट्राची जबाबदारी सोपविण्यात आली. नानाजींनी संघ कार्यात स्वत:ला झोकूनच दिले असे नाही, तर आपले संपूर्ण जीवन संघकार्याला वाहून घेतले. विनोबाजींच्या भूदान चळवळीतही त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. मात्र, त्यांचा ओढा संघकार्याकडे अधिक असल्याने ते संघातच रमले.
उत्तरप्रदेशात नानाजींनी शिक्षण कार्यावर विशेष भर दिला. त्यांच्याच प्रयत्नाने गोरखपूर येथे सरस्वती शिशु मंदिर सुरू झाले. रा. स्व. संघाने १९४७ मध्ये सुरू केलेल्या ‘राष्ट्रधर्म’ आणि पांचजन्य’ या दोन साप्ताहिकाच्या संपादनाची जबाबदारी अटल बिहारी वाजपेयी यांच्यावर होती, मात्र या नियतकालिकांची आर्थिक बाजू नानजींनी सांभाळली. १९४८ साली महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर संघावर बंदी आली. त्यामुळे भूमिगत राहून नानाजींनी कापले कार्य चालू ठेवले.