महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंना भारतरत्न द्या; सुप्रिया सुळेंची लोकसभेत मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2018 09:56 AM2018-03-06T09:56:11+5:302018-03-06T09:56:11+5:30
फुले दाम्पत्यास भारतरत्न जाहीर झाल्यास महाराष्ट्रच नव्हे तर देशातील सामाजिक सुधारणांच्या चळवळींचा तो गौरव ठरेल.
नवी दिल्ली: महिला शिक्षणासाठी आयुष्य खर्ची घालणारे महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सोमवारी लोकसभेत केली.
महात्मा फुले आणि सावित्रीबाई हे दोघेही महिला शिक्षणाचे प्रणेते होते. त्यामुळे फुले दाम्पत्यास भारतरत्न जाहीर झाल्यास महाराष्ट्रच नव्हे तर देशातील सामाजिक सुधारणांच्या चळवळींचा तो गौरव ठरेल, असे सुळे यांनी म्हटले. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्याला सोमवारपासून सुरूवात झाली. यावेळी नियम ३७७ अंतर्गत सुप्रिया सुळे यांनी सभागृहात ही मागणी केली. पुण्यातील बुधवार पेठेतील भिडे वाड्यामध्ये महात्मा फुले यांनी १८४८ साली मुलींची शाळा सुरु केली. सावित्रीबाई फुले त्या शाळेतील पहिल्या शिक्षिका होत्या. या दोघांनी तत्कालिन सामाजिक व्यवस्थेला झुगारुन हे क्रांतीकारक पाऊल उचलले. स्त्री-पुरुष समानतेचा पाया त्यांनी घातला, असे सुप्रिया सुळेंनी सांगितले. दलित, शोषित, महिला आणि शेतकरी यांच्या भल्यासाठी त्यांनी शेवटपर्यंत लढा दिला. त्यांना भारतरत्न जाहीर व्हावा, यासाठी पक्षभेद विसरुन सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
Mahatma Jyotiba Phule and Savitribai Phule were the pioneers of Girl child education. Requested the government to bestow them posthumously 'Bharat Ratna' in the Parliament under Rule 377.
— Supriya Sule (@supriya_sule) March 5, 2018