कोण आहेत डॉ. एमएस स्वामीनाथन? ज्यांना जाहीर झालाय देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2024 03:44 PM2024-02-09T15:44:21+5:302024-02-09T16:05:15+5:30
डॉ. एम एस स्वामीनाथन यांचं भारतीय कृषी आणि शेतकरी कल्याणामध्ये मोठं योगदान आहे.
नवी दिल्ली : भारतातील हरित क्रांतीचे जनक (father of green revolution) डॉ. एम एस स्वामीनाथन यांना भारतरत्न देण्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंट 'एक्स' (पूर्वीचे ट्विटर) ट्विट करून ही माहिती दिली आहे. डॉ. एम एस स्वामीनाथन यांनी आपल्या देशासाठी कृषी आणि शेतकरी कल्याणात अतुलनीय योगदान दिले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना भारतरत्न प्रदान करण्यात येत आहे. याचा अत्यंत आनंद असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले.
डॉ. एम एस स्वामीनाथन यांच्याबरोबर माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंह, माजी पंतप्रधान नरसिंह राव यांना देखील भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. दरम्यान, भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. एखाद्या क्षेत्रात असाधारण आणि सर्वोच्च कामगिरी केल्याबद्दल केंद्र सरकारकडून भारतरत्न पुरस्कार देण्यात येतो. राजकारण, कला, साहित्य, क्रीडा,विज्ञान क्षेत्रातील विचारवंत, शास्त्रज्ञ, उद्योगपती, लेखक आणि समाजसेवक यांना या पुरस्काराने गौरवण्यात येते. अलीकडेच बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांनाही भारतरत्नने सन्मानित करण्यात आले आहे.
It is a matter of immense joy that the Government of India is conferring the Bharat Ratna on Dr. MS Swaminathan Ji, in recognition of his monumental contributions to our nation in agriculture and farmers’ welfare. He played a pivotal role in helping India achieve self-reliance in… pic.twitter.com/OyxFxPeQjZ
— Narendra Modi (@narendramodi) February 9, 2024
डॉ. एम एस स्वामीनाथन यांच्याविषयी....
डॉ. एम एस स्वामीनाथन यांचं भारतीय कृषी आणि शेतकरी कल्याणामध्ये मोठं योगदान आहे. भारतात हरितक्रांती घडवून आणण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. डॉ. एम एस स्वामीनाथन यांनी जगभरातील कृषी विद्यार्थ्यांसह कृषिसंशोधन आणि वनस्पतींची पैदास आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन या विषयांवर काम केले आहे. डॉ. एम एस स्वामीनाथन यांचा जन्म तामिळनाडूतील कुंभकोणम याठिकाणी 7 ऑगस्ट 1925 रोजी झाला होता. डॉ. मोणकोंबू सांबशिवन स्वामीनाथन असे त्यांचे पूर्ण नाव होते. त्यांनी कृषी क्षेत्रातील संशोधनासाठी 'एम.एस. स्वामिनाथन रिसर्च फाऊंडेशन'ची स्थापना केली होती. भारत सरकारने डॉ. एम एस स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली स्वामीनाथन आयोगाची स्थापन केली होती. डॉ. एम एस स्वामीनाथन यांना 1987 मध्ये प्रथम जागतिक अन्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. याशिवाय त्यांना पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण, शांती स्वरूप भटनागर पुरस्कार, रॅमन मॅगसेसे पुरस्कार आणि अल्बर्ट आइनस्टाइन जागतिक विज्ञान पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.