लोकसभा निकालाचा परिणाम की...? भाजपनं अनेक राज्यांत नियुक्त केले नवे प्रभारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2024 18:47 IST2024-07-05T18:46:21+5:302024-07-05T18:47:01+5:30
भारतीय जनता पक्षाने देशातील अनेक राज्यांमध्ये नव्या प्रभारी आणि सहप्रभारींची नेमनूक केली आहे. संघटनेच्या या नव्या प्रभारी आणि सहप्रभारींच्या ...

लोकसभा निकालाचा परिणाम की...? भाजपनं अनेक राज्यांत नियुक्त केले नवे प्रभारी
भारतीय जनता पक्षाने देशातील अनेक राज्यांमध्ये नव्या प्रभारी आणि सहप्रभारींची नेमनूक केली आहे. संघटनेच्या या नव्या प्रभारी आणि सहप्रभारींच्या नावांची यादीही शुक्रवारी सायंकाळी जाहीर करण्यात आली. लोकसभा निवडणूक 2024 च्या निकालानंतर तसेच आगामी काही राज्यांतील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने हा मोठा निर्णय घेतला आहे.
भाजपच्या यादीत 23 राज्ये -
भाजपने जाहीर केलेल्या या यादीत 23 राज्ये आणि इशान्येकडील प्रदेश प्रभारी तथा सह प्रभारी नियुक्तीची माहिती दिली आहे. यानुसार, आमदार अशोक सिंघल यांना अरुणाचल प्रदेशचे प्रभारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. श्रीकांत शर्मा यांना हिमाचल प्रदेशचे प्रभारी म्हमून नियुक्त करण्यात आले आहे. तर संजय टंडन सह प्रभारी असतील. जम्मू-काश्मीरच्या प्रभारीपदाची धुरा तरुण चुघ यांच्या खांद्यावर देण्यात आली आहे. कर्नाटकचे प्रभारी म्हणून राधा मोहन दास अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
याच वर्षात महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंडमध्ये निवडणुका -
याच वर्षात महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंडमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. भाजपच्या या यादीत महाराष्ट्राच्या प्रभारी अथवा सहप्रभारींचे नाव नाही. झारखंडमध्ये आधीच तैनात असलेले लक्ष्मीकांत वाजपेयी हेच पुढेही काम बघतील. तर, राजधानी दिल्लीला लागून असलेल्या हरियाणामध्ये राजस्थानचे माजी प्रदेशाध्यक्ष सतीश पुनिया यांना प्रभारी म्हणून आणि सुरेंद्र सिंह नागर यांना सहप्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.
Bharatiya Janata Party appoints State in-charge and Co-in charge for various States pic.twitter.com/p9gRmBmoJy
— ANI (@ANI) July 5, 2024
बदलाची सुरुवात...?
भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह यांनी प्रदेश प्रभारी आणि सहप्रभारींच्या नियुक्तीचे पत्र जारी केले आहे. काही राज्यांमध्ये केवळ प्रभारी तर काही राज्यांमध्ये सहप्रभारीही नियुक्त करण्यात आले आहेत. लोकसभा निवडणूक झाल्यापासूनच भाजप मोठ्या प्रमाणावर बदल करेल, अशी शक्यता वर्तवली जात होती. आता राज्यांमधील प्रभारी आणि सह प्रभारींच्या नियुक्तीने याची सुरुवात झाल्याचे बोलले जात आहे.