'भारतीय जनता पक्ष सर्वांच्या मतांचा आदर करतो'; CM योगी आदित्यनाथ यांची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2021 02:19 PM2021-11-19T14:19:43+5:302021-11-19T14:21:58+5:30
तीनही कृषी कायदे मागे घेण्याच्या मुद्द्यावर बोलताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले.
लखनऊ: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी देशाला संबोधित करताना तीनही कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली. या निर्णयानंतर विविध नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. यावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, 'भारतीय जनता पक्ष सर्वांच्या मतांचा आदर करतो. सरकारच्या या निर्णयाचे स्वागत करायला हवे', अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
'पंतप्रधानांचे आभार'
कृषी कायद्यांवर बोलताना मुख्यमंत्री योगी म्हणाले, 'मी पंतप्रधान मोदींचे आभार मानतो आणि त्यांनी उचललेल्या या पावलाचे स्वागत करतो. असे कायदे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यात अत्यावश्यक भूमिका बजावू शकतात. पण शेतकऱ्यांचा एक मोठा गट या कायद्यांच्या विरोधात आहे. त्यांच्या भावनांचा आदर करत हे कायदे परत घेण्यात आले आहेत,' असेही ते म्हणाले.
...तोपर्यंत आंदोलन परत घेणार नाही
पीएम मोदींनी कृषी कायदा मागे घेण्याची घोषणा करताना शेतकऱ्यांना घरी परतण्याचे आवाहन केले होते. या सगळ्यात शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व करणारे शेतकरी नेते राकेश तिकट यांनी शेतकरी आंदोलन तातडीने मागे घेण्याच्या मनस्थितीत नसल्याचे संकेत दिले आहेत. तिकैट म्हणाले की, संसदेत कृषीविषयक कायदे रद्द होतील त्या दिवसाची आम्ही वाट पाहणार आहोत. याशिवाय, सरकारने एमएसपीसोबतच शेतकऱ्यांशी संबंधित इतर समस्यांवरही चर्चा करावी, असेही तिकैट म्हणाले आहेत.
विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला
सरकारच्या या निर्णयानंतर देशभरातील नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विट करून म्हटले की, 'देशाच्या अन्नदात्याने गर्विष्ठांची मान झुकवली. अन्यायाविरुद्धच्या या विजयाबद्दल अभिनंदन! जय हिंद, जय हिंदचा शेतकरी!'. त्याचवेळी, काँग्रेसने ट्विट करून 'अभिमान तुटला, माझ्या देशाचा शेतकरी जिंकला' असे म्हटले आहे.