मोदी सरकारच्या अडचणी वाढणार; 'घरच्या' संघटना उद्या अन् परवा रस्त्यावर उतरणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2021 05:29 PM2021-09-07T17:29:37+5:302021-09-07T17:32:54+5:30

संघाशी संबंधित संघटनांकडून भारत बंदची हाक; सर्व जिल्ह्यांमध्ये आंदोलनं होणार

bharatiya mazdoor sangh and bharatiya kisan sangh will protest against central government | मोदी सरकारच्या अडचणी वाढणार; 'घरच्या' संघटना उद्या अन् परवा रस्त्यावर उतरणार

मोदी सरकारच्या अडचणी वाढणार; 'घरच्या' संघटना उद्या अन् परवा रस्त्यावर उतरणार

googlenewsNext

नवी दिल्ली: भारतीय जनता पक्षाशी वैचारिक नातं असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं केंद्र सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतलेला दिसत आहे. संघाशी संबंधित भारतीय किसान संघानं शेतकऱ्यांच्या समस्यांवरून उद्या देशव्यापी बंदची हाक दिली आहे. तब्बल ५०० जिल्ह्यांमध्ये भारतीय किसान संघ धरणं आंदोलन करणार आहे. जिल्हा प्रशासनांना याबद्दलची माहिती देण्यात आली असल्याचं भारतीय किसान संघाचे महामंत्री बद्रिनाथ चौधरी यांनी सांगितलं.

बद्रिनाथ चौधरींनी आज पत्रकार परिषद घेत उद्याच्या देशव्यापी बंदची माहिती दिली. 'ऑगस्टमध्ये आम्ही सर्व प्रांतांच्या प्रतिनिधींची बैठक घेतली. त्यात शेतकऱ्यांच्या समस्यांवर चर्चा केली. उद्या म्हणजेच ८ सप्टेंबरला आम्ही देशव्यापी आंदोलन करणार आहोत. ५०० जिल्ह्यांत सांकेतिक धरणं आंदोलन करण्यात येईल. शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळायला हवा. व्यापारी त्यांच्या हिशोबानं शेतमाल खरेदी करतात. सरकार एमएसपीची घोषणा करतं. पण पैसे ६ महिन्यांनी मिळतात. शेतकऱ्यांनी पिकवलेल्या मालापैकी २५ टक्केच माल सरकार खरेदी करतं. त्यातही केवळ दोनच राज्यांमधून सरकार शेतमालाची खरेदी करतं,' असा समस्यांचा पाढाच चौधरींनी वाचून दाखवला.

राज्यात पुन्हा कडक निर्बंध लागणार का? मंत्री वडेट्टीवारांनी स्पष्टच सांगितलं...

'किमान हमीभावासाठी सरकारनं कायदा करायला हवा. शेतकऱ्यांना योग्य हमीभाव मिळावा यासाठीची व्यवस्था सरकारनं करायला हवी. आता दिला जाणारा हमीभाव डोळ्यात धूळफेक करणारा आहे. उद्या आम्ही जंतरमंतर सकाळी ११ वाजता आंदोलन करू. आम्ही केंद्राचे तीन कृषी कायदे स्वीकारले. मात्र त्यात ५ सुधारणा व्हाव्यात अशी मागणी आम्ही आधीच केली होती,' याची आठवण त्यांनी करून दिली. संयुक्त किसान मोर्चाच्या भारत बंदमध्ये आम्ही त्यांच्यासोबत नाही, ही बाब चौधरींनी स्पष्ट केली.

संघाशी संबंधित भारतीय मजूर संघटना वाढत्या महागाईविरोधात ९ सप्टेंबरला रस्त्यावर उतरणार आहे. सर्व जिल्ह्यांमधील कार्यकर्ते महगाईविरोधात आंदोलन करणार असल्याची माहिती भारतीय मजूर संघाचे सचिव गिरीश आर्य यांनी दिली. भारतीय मजूर संघ २८ ऑक्टोबरलादेखील आंदोलन करणार आहे. मोदी सरकारच्या खाजगीकरणाच्या धोरणाविरोधात भारतीय मजूर संघानं आक्रमक भूमिका घेतली आहे.

Web Title: bharatiya mazdoor sangh and bharatiya kisan sangh will protest against central government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.