‘भारतमाता की जय’ इस्लामविरोधी
By admin | Published: April 2, 2016 04:11 AM2016-04-02T04:11:04+5:302016-04-02T08:19:27+5:30
इस्लाममध्ये मूर्तिपूजा पूर्णपणे निषिद्ध आहे. ‘भारत माता की जय’ या उद्घोषणेत भारतमातेच्या मूर्तीचा जयघोष अपेक्षित असल्याने मुस्लिमांनी ‘भारत माता की जय’ म्हणणे इस्लामी धर्मशास्त्राला धरून होणार नाही.
लखनौ : इस्लाममध्ये मूर्तिपूजा पूर्णपणे निषिद्ध आहे. ‘भारत माता की जय’ या उद्घोषणेत भारतमातेच्या मूर्तीचा जयघोष अपेक्षित असल्याने मुस्लिमांनी ‘भारत माता की जय’ म्हणणे इस्लामी धर्मशास्त्राला धरून होणार नाही, असा फतवा देवबंद येथील दारुल उलूम या प्रतिष्ठित इस्लामी पाठशाळेने काढला आहे.
दारुल उलूमच्या धर्मवेत्त्यांनी हा फतवा १९ मार्च रोजी काढला असला तरी गुरुवारी रात्री सोशल मीडियावर प्रसार झाल्याने त्याची माहिती सर्वदूर झाली. ‘भारत माता की जय’ म्हणणे किंवा न म्हणण्यावरून देशाच्या अनेक भागात अलीकडेच निर्माण झालेला वाद आणि संघ परिवाराने त्याची सांगड राष्ट्रवादाशी घातल्याच्या पार्श्वभूमीवर देशातील अनेक मुस्लिमांनी देवबंदच्या दारुल उलूमला पत्रे पाठवून याविषयी इस्लामी धर्मशास्त्र नेमके काय सांगते याचा खुलासा करण्याची विनंती केली होती. काहीजणांनी पत्रांसोबत भगव्या वस्त्रातील त्रिशूळधारी भारमातेची चित्रेही पाठविली होती. दारुल उलूमचे प्रवक्ते अश्रफ उस्मानी यांनी सांगितले की, आमच्या पाठशाळेत मौलाना हबीबुर्रहमान हैदराबादी यांच्या नेतृत्वाखाली इतर धर्मवेत्त्यांनी कुराण आणि हदीसच्या आधारे विचारविनिमय करून सामूहिक मत या फतव्याच्या रूपाने जारी केले आहे. या फतव्यात म्हटले आहे की, हिंदूंमधील काही लोक भारत या आपल्या देशाची ‘भारतमाते’च्या स्वरूपात देवीच्या रुपाने कल्पना करून तिचे पूजन करतात. इस्लामही स्वदेशावर प्रेम करण्यास शिकवितो, पण देशाला देव मानून त्याची भक्ती व पूजन करणे इस्लामला मान्य नाही.
‘भारतमाता की जय’ म्हणण्यास
प्रतिबंध करणे हा देशासाठी हौतात्म्य पत्करलेल्यांचा अपमान आहे. यावरून त्यांची मानसिकता दिसून येते. आपण पाकिस्तानात राहत नाही याची त्यांनी जाणीव ठेवावी.
-साध्वी निरंजन ज्योती,
केंद्रीय अन्नप्रक्रिया राज्यमंत्री