भारिप बमसंने पंचायत समितीचा गड राखला
By admin | Published: June 28, 2016 07:05 PM2016-06-28T19:05:53+5:302016-06-28T19:30:39+5:30
विरोधकांकडे ७ सदस्य असले तरी महाआघाडी होण्यास राजकीय पक्षातील गटबाजी कारणीभूत.
बाळापूर : बाळापूर पंचायत समिती सभागृहात सर्वात मोठा पक्ष म्हणून भारिप बमसं पक्ष आहे. विरोधकांकडे ७ सदस्य असले तरी महाआघाडी होण्यास राजकीय पक्षातील गटबाजी कारणीभूत आहे. त्यामुळे काठावर बहुमत असलेला भारिपने पंचायत समितीचा गड इतर पक्षातील गटबाजीने राखला.
भारिप बमसंचे रिमोट पक्ष सर्वेसर्वा ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी भारिप बमसंच्या सातही सदस्यांना लोकशाही पद्धतीने मतदान घेऊन भारिप बमसं व इतर पक्षातील मते खेचणार्या उमेदवाराला सभापती पदाची संधी दिली. मागील वेळी भारिप बमसंने काँग्रेसचा उमेदवार फोडून त्याला सभापती केले होते. यावेळी काँग्रेसचे तीनही उमेदवार उपसभापती पदाचे बाशिंग बांधून होते. त्यामुळे भारिप बमसंचला आयतीच संधी भेटली. त्यामुळे भारिप बमसंच्या विरोधात कुणीही पुढाकार घेतला नाही. भाजप व काँग्रेसजवळ सभापतीचा उमेदवार नव्हता. एकमेव राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुलभाताई दादाराव लोड या उमेदवार होत्या. परंतु संख्याबळ व काँग्रेसच्या सदस्यात उपसभापतीचे खूळ असल्याने त्यांनी सभापतीपदी नामांकन दाखल केले नाही. भारिप बमसंवजळ सभापती पदाचे दोन सशक्त दावेदार होते. धनगर समाजाच्या मंगला तितूर व कुणबी समाजाच्या नंदा जनार्धन साबळे या होत्या. परंतु पक्ष आदेशाने त्यांनी माघार घेतली. परंतु भारिप बमसंचने कुणबी समाजाला संधी न दिल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली. अद्यापही भारिप बमसंने सभापतीपदी कुणबी समाजाला संधी दिली नाही. उलट धनगर समाजाला दुसर्यांदा संधी मिळाली. वेळेवर भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसने नंदा साबळेंना सभापती पदासाठी समर्थ देण्यसाठी पुढाकार घेतला. परंतु पक्ष आदेश असल्याने आदेशाचे पालन केले, असे नंदा साबळे यांनी सांगितले. काँग्रेस पक्षाचे ३ सदस्य उपसभापती पदासाठी भारिप बमसंसमोर लोटांगण घेत होते. कुणाला संधी मिळते, याची वाटपाहत असताना काँग्रेसच्या अनिताबी शे. फिरोज, माजी उपसभापती प्रशांत मानकर व विजय ढाकरे यांनी उपसभापती पदासाठी नामांकन भरले. ही संधी साधण्यासाठी भारिप बमसंजवळ ७ सदस्य असल्याने विरोधकातील फुअीचा फायदा उचलण्यासाठी भारिप बमसंचे नामदेव मास्कर यांनी नामांकन दाखल केले. भाजपच्यावतीने शकुंतला वानखडे यांनी नामांकन दाखल केले.