Cabinet Reshuffle: डॉ. भारती पवार मंत्री होताच, प्रीतम मुंडे-रक्षा खडसेंचा लोकसभेत हसतानाचा व्हिडीओ चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2021 05:02 PM2021-07-08T17:02:44+5:302021-07-08T17:06:19+5:30
Dr. Bharati Pawar : बुधवारी महाराष्ट्रातील नव्या शिलेदारांनी घेतली मंत्रिपदाची शपथ. भारती पवार यांनाही देण्यात आलं राज्यमंत्रीपद.
साऱ्या देशाला अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार बुधवारी होऊन ४३ मंत्र्यांचा राष्ट्रपती भवनामध्ये शपथविधी झाला. त्यामध्ये १५ जणांनी कॅबिनेट तर २८ जणांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली. महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते नारायण राणे यांना कॅबिनेट तर कपिल पाटील, डॉ. भारती पवार, डॉ. भागवत कराड यांना राज्यमंत्रीपद देण्यात आले आहे. मोदींचे मंत्रिमंडळ आता ७८ जणांचे झाले असून त्यात ३८ नव्या चेहेऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. दरम्यान, भारती पवार यांचा शपथविधी झाल्यानंतर त्या लोकसभेत चर्चेदरम्यान बोलतानाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
डॉ. भारती पवार यांनी बुधवारी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्याकडे आता महिला विकास आणि बाल कल्याण विभागाची धुरा देण्यात आली आहे. दरम्यान, त्यांच्या शपथविधीनंतर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये भारती पवार या लोकसभेतील चर्चेदरम्यान काही प्रश्न मांडताना आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्तुती करताना दिसत आहेत. परंतु त्यांच्या मागील रांगेत भाजपच्या खासदार प्रीतम मुंडे आणि खासदार रक्षा खडसेही बसलेल्या दिसत आहेत. दरम्यान शेतकरी कर्जमाफीबद्दल फडणवीसांचे आभार व्यक्त करताना प्रीतम मुंडे आणि रक्षा खडसे यांना हसू येत होतं. तसंच त्यांना हसू इतकं अनावर झालं की त्या बाकाच्या खालीही जाऊन हसल्या. परंतु काही वेळातच त्या पुन्हा गंभीर झाल्या.
दरम्यान, या व्हिडीओमध्ये हसताना दिसत असलेल्या प्रीतम मुंडे आणि रक्षा खडसे या कशावरून हसत आहेत हे मात्र स्पष्ट झालेलं नाही. परंतु पवार यांच्या शपथविधीनंतर अनेकांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. तसंच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात हा व्हिडीओ व्हायरलही होत आहे.
ज्यांच्यावर प्रीतम मुंडे रक्षा खडसे हसल्या त्यांना आज केंद्रीय मंत्री मंडळात स्थान मिळाले आहे.
— Shilpa Bodkhe - प्रा.शिल्पा बोडखे (@BodkheShilpa) July 7, 2021
जुनी म्हण आहे 'गर्वाचे घरं नेहमी खाली असतात' @rajuparulekar@sakshijoshii@ParagSMohite@mayurkamble9pic.twitter.com/5ylOYINYxj
काय म्हणाल्या होत्या पवार?
"देवेंद्र फडणवीस यांचे कर्जमाफी केल्याबद्दल आभार मानते. महोदय सध्या पाण्यावरून गावा गावात, तालुक्या तालुक्यात, जिल्ह्या जिल्ह्यात वाद आहेत. पुढच्या काळात याच्यावर लक्ष देणे गरजेचे आहे. याचाच विचार करून जलशक्ती मंत्रालय उभारले, त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानते. माझ्या दिंडोरी मतदारसंघातल्या गावांमध्ये २० ते २५ दिवसांनी पाणी येतं. त्यामुळे केंद्र सरकारने वांजूळ दमनगंगा पाणी योजना असेल तसेच मांजरपाडा २ याच्यासारखे प्रकल्प मार्गी लाऊन नाशिक जिल्ह्यासह जळगाव, नगर व मराठवाड्याला न्याय द्यावा ही विनंती करते," असं त्या ४२ सेकंदांच्या व्हिडीओमध्ये बोलताना दिसत आहेत.