पंतप्रधानांनी मोठी जबाबदारी सोपविली; लसीकरण, कोरोनाशी लढ्याला प्राधान्य देणार - भारती पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2021 10:30 AM2021-07-09T10:30:53+5:302021-07-09T10:32:45+5:30
दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉ. भारती पवार यांची थेट केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्रिपदी व त्यातल्या त्यात त्यांच्या आवडीच्या असलेल्या आरोग्य क्षेत्राची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आल्याने त्यांना समाधान आहे.
नाशिक : केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्रिपदाची सूत्रे गुरुवारी डॉ. भारती पवार यांनी स्वीकारली असून, देशापुढे असलेले कोरोनाचे संकट पाहता, आगामी काळात कोरोनाशी लढा व देशातील प्रत्येक व्यक्तीच्या लसीकरणाला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. दिल्लीतील शपथविधी सोहळ्यासाठी ऐनवेळी बोलावणे आल्याने एकट्याच गेलेल्या डॉ. भारती पवार यांच्या भेटीसाठी गुरुवारी कुटुंबातील सदस्य दिल्लीला रवाना झाले आहेत.
दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉ. भारती पवार यांची थेट केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्रिपदी व त्यातल्या त्यात त्यांच्या आवडीच्या असलेल्या आरोग्य क्षेत्राची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आल्याने त्यांना समाधान आहे. यानिमित्ताने का होईना, वैद्यकीय सेवेला हातभार लागण्याची संधी आरोग्य राज्यमंत्रिपदामुळे मिळाल्याचे डाॅ. पवार यांनी सांगितले. देशात लसीकरणाने वेग धरला असून, डिसेंबरअखेरपर्यंत प्रत्येक नागरिकाचे लसीकरण पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यादृष्टीने पावले उचलली जातील, असेही त्या म्हणाल्या.
पंतप्रधानांनी मोठी जबाबदारी सोपविली
मंत्रिपदाचा कोणताही अनुभव पाठीशी नसतानाही पक्षाने व पंतप्रधानांनी मोठी जबाबदारी सोपविली असून, देशापुढील कोरोनाचे संकट गेल्या वर्षभरापासून कायम आहे. आगामी काळात कोरोनाशी लढा व देशातील प्रत्येक व्यक्तीच्या लसीकरणाला प्राधान्य देण्यात येईल.
- भारती पवार, केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री