भय्युजी महाराज : राजधर्मावर प्रभाव असलेला आध्यात्मिक गुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 05:49 AM2018-06-13T05:49:53+5:302018-06-13T05:49:53+5:30

बहुतेक सगळ्याच पक्षाच्या महाराष्ट्रातील नेते-कार्यकर्त्यांना भय्युजी महाराज जवळचे वाटायचे. नगरपालिकेपासून खासदारकीपर्यंतच्या तिकिटासाठी इच्छुक इंदूरला जाऊन त्यांचे आशीर्वाद घेत.

Bhayyuji Maharaj: The spiritual master who has influenced on politics | भय्युजी महाराज : राजधर्मावर प्रभाव असलेला आध्यात्मिक गुरू

भय्युजी महाराज : राजधर्मावर प्रभाव असलेला आध्यात्मिक गुरू

Next

विशेष प्रतिनिधी  
मुंबई : बहुतेक सगळ्याच पक्षाच्या महाराष्ट्रातील नेते-कार्यकर्त्यांना भय्युजी महाराज जवळचे वाटायचे. नगरपालिकेपासून खासदारकीपर्यंतच्या तिकिटासाठी इच्छुक इंदूरला जाऊन त्यांचे आशीर्वाद घेत. उमेदवारी मिळवून देण्यासाठी त्यांना गळ घालत. मोठ्या निवडणुकीचा हंगाम आला की इच्छुकांचे पाय आपोआप इंदूरकडे वळत. अनेक आमदार, खासदार, मंत्री, अधिकारी त्यांचे भक्त होत गेले.
भय्युजी महाराजांना सर्व पक्षांच्या नेत्यांमध्ये मान्यता होती. दिवंगत विलासराव देशमुखांशी त्यांचा जेवढा स्नेह तितकेच ते भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरींचेही निकटवर्ती. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, त्यांचे कुटुंबीय यांच्याशीही त्यांचा अपार स्नेह होता. राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांशी त्यांची जवळीक होती.
महाराजांनी मनावर घेतले तर आपल्याला तिकीट नक्की मिळेल, अशी अनेकांची खात्री असे. मराठा समाजातून आलेले महाराज आणि त्या समाजाचे महाराष्ट्रातील नेत्यांशी त्यांचे असलेले सख्य ही बाबही अनेक इच्छुकांना त्यांच्या दरबारात घेऊन जाणारी होती. मोठमोठ्या कंत्राटी कामांसाठी महाराजांनी टाकलेला शब्द खाली जाणार नाही, या विश्वासानेही लोक त्यांच्याकडे जात. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात अन् दिल्लीमध्येही महाराजांचा बोलबाला वाढला. महत्त्वाकांक्षी लोकांची वर्दळ त्यांच्याकडे वाढत गेली अन् मग ही महत्त्वाकांक्षा त्यांनाही त्यातून चिकटली, असे म्हटले जाऊ लागले.
प्रचंड प्रतिभा, अत्यंत देखणे आणि आकर्षक असे राजबिंडे रूप आणि मधाळ वाणी लाभलेले भय्युजी महाराज यांनी प्रचंड मोठे सेवाकार्य उभे केले.

बड्या मंडळींमध्ये ऊठबस
भय्युजी महाराज यांचा महाराष्ट्र व मध्य प्रदेशात नावलौकिक होता. या दोन राज्यांत त्यांना मानणाऱ्यांची संख्या मोठी होती. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक तसेच बॉलिवूड व क्रीडा क्षेत्रातील अनेक मंडळींचे ते गुरू होते. ते राजकीय नेत्यांचे सल्लागार होते, अनेक सामाजिक कार्यांत त्यांचा सहभाग होता. वृक्षारोपणापासून, शरीरविक्रय करणाºया स्त्रियांच्या मुलींना स्वत:चे नाव लावू देणे, शेतकºयांना आत्महत्या करण्यापासून रोखण्यासाठी प्रयत्न करणे या साºयांमुळे ते सामान्य जनांमध्येही लोकप्रिय होते.
भय्युजी महाराजांना भेटण्यासाठी माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसेप्रमुख राज ठाकरे, गायिका आशा भोसले, गायिका अनुराधा पौडवाल यांच्यासह चित्रपटसृष्टीतील अनेक अभिनेते आणि अभिनेत्री जात असत. अनेक राजकीय वाद मिटवण्यात त्यांचा मोठा वाटा होता.
भय्युजी महाराजांचे खरे नाव उदयसिंह होते. त्यांचा जन्म २९ एप्रिल १९६८ रोजी मध्य प्रदेशातील शाजापूर जिल्ह्याच्या शुजालपूर गावी शेतक-याच्या घरी झाला होता. लहानपणी ते वडिलांबरोबर सुरुवातीला शेतीही करायचे. घोडेस्वारी आणि तलवारबाजीत त्यांनी विशेष प्रावीण्य मिळवले होते. तरुणपणी कविताही लिहिल्या. मुंबईत काही काळ त्यांनी नोकरी केली. पण तिथे मन रमले नाही. सियाराम सुटिंग्जसाठी त्यांनी मॉडेलिंग केले होते. त्यांचा ओढा अध्यात्माकडेच होता.
मात्र अलीकडेच आपण अध्यात्म व सामाजिक कार्यातून निवृत्त होत आहोत, असे भय्युजी महाराजांनी जाहीर केले होते. बहुधा विवाहामुळे त्यांनी तो निर्णय घेतला असावा, अशी चर्चा होती. माझ्यातील ताकद आता संपली आहे, त्यामुळे मी हा निर्णय घेतला आहे, असे त्यांनी तेव्हा सांगितले होते.
त्यांना भगवान दत्ताचा आशीर्वाद लाभल्याचीही चर्चा होती. महाराष्ट्रात त्यांना राष्ट्रसंताचा दर्जा बहाल करण्यात आला होता. ते सूर्याची उपासना करीत. तसेच त्यांनी पाण्यातही साधना केली होती. दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखांचे ते निकटवर्तीय होते. भाजपा नेते नितीन गडकरी ते सरसंघचालक मोहन भागवत यांच्याशी त्यांचा जिव्हाळ्याचा संबंध होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशीही त्यांचे उत्तम संबंध होते.
त्यांचा इंदूरमध्ये श्री सद्गुरू दत्त धार्मिक व परमार्थिक ट्रस्ट होता. त्या ट्रस्टद्वारे ते सारे कार्य करीत. भय्युजी महाराजांना व्यक्तिपूजा मान्यच नव्हती. ते नारळ, शाल व हार कधीच स्वीकारत नसत. हार व नारळावर पैसे वाया घालवू नका, असा त्यांचा सल्ला असायचा. त्यांनी १0 हजारहून अधिक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली.
आपले शिष्य तयार केले नाहीत आणि होऊ दिले नाहीत. महाराष्ट्र व मध्य प्रदेशात शिक्षण, आरोग्य, पर्यावरण व सामाजिक क्षेत्रात त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय आहे. पंढरपुरातल्या देहविक्रय करणाºया महिलांच्या मुलांना त्यांनी स्वत:चे नाव लावू दिले. बुलडाण्यात आदिवासींच्या ७00 मुलांसाठी त्यांनी शाळा बांधली. त्यांनी पारधी समाजाला शिक्षणाचे महत्त्व सांगण्याचा प्रयत्न केला. तिथे त्यांच्यावर दगडफेकही झाली होती. पण त्यांचाही विश्वास संपादन केला.
आपणास गुरुदक्षिणा देण्याऐवजी तुम्ही वृक्षारोपण करा, असे ते सांगत. त्याद्वारे आतापर्यंत १८ लाख झाडे लावली गेली आहेत. मध्य प्रदेशच्या आदिवासी भागांत त्यांनी सुमारे एक हजार तलाव बांधले होते.

वैयक्तिक जीवनात अनेक चढउतार...
पहिल्या पत्नीचे निधन, दुस-या विवाहाने निर्माण झालेला वाद, एका महिलेने त्यांच्याशी असलेल्या संबंधांवरून केलेले आरोप अशा वादग्रस्त वैयक्तिक आयुष्याची किनार त्यांच्या आध्यात्मिक योग्यतेवर नेहमीच प्रश्नचिन्ह उपस्थित करीत राहिली. एखादी व्यक्ती अध्यात्माची उपासक असावी आणि त्याचवेळी त्याविपरीत कृती तिच्या हातून घडत असल्याचे आरोप होत राहावेत तसे काहीसे त्यांच्याबाबत घडत राहिले.
मी अध्यात्म त्यागले आता मी संसारी झालो आहे, असे सांगत त्यांनी हे द्वंद्व संपविण्याचा प्रयत्न केला पण तोवर उशीर असावा, नैराश्याने त्यांना पुरते ग्रासले, त्यातच शारिरीक व्याधीही वाढल्या आणि त्यांनी आत्महत्येचा मार्ग पत्करला असावा. अर्थात हा तर्क आहे आणि त्यांची एकूणच वाटचाल या तर्काला बळ देणारी आहे.

 

आध्यात्मिक ज्ञान प्राप्त झालेले संत अशी त्यांची ओळख निर्माण झाली खरी; पण राजकीय नेते, बड्या व्यक्तींच्या त्यांच्या दरबारातील सततच्या हजेरीने त्यांच्या संतत्वाची दुसरी बाजूही आहे याची चर्चादेखील वरचेवर होत राहिली.

भय्युजी महाराज यांच्या आकस्मिक निधनाने सामाजिक आणि आध्यात्मिक क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे एक सेवाभावी व्यक्तिमत्त्व आपण गमावले आहे. त्यांच्या आध्यात्मिक विचारधारेचे अधिष्ठान लोकसेवा हेच होते. त्यांनी सूर्योदय परिवाराच्या माध्यमातून समाजहितासाठी राबविलेल्या विविध उपक्रमांचा वंचित आणि उपेक्षित समाजघटकांना मोठा लाभ झाला आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमध्ये त्यांनी केलेल्या जलसंधारणाच्या कामामुळे हजारो हेक्टर जमिनीला पाणी मिळाले आहे.
- देवेंद्र फडणवीस,
मुख्यमंत्री
आध्यात्मिक गुरू भय्युजी महाराज यांच्या निधनाची दु:खद बातमी कळली. त्यांच्याशी माझे व्यक्तिगत जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांचा हा अकाली मृत्यू मनाला चटका लावणारा आहे.
- नितीन गडकरी,
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री
अनेकांना जीवन जगण्याचा
मंत्र त्यांनी दिला. आपल्या सर्वांची मोठी आध्यात्मिक आणि सामाजिक हानी
झाली आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.
- धनंजय मुंडे,
विरोधी पक्षनेते, विधान परिषद
भय्युजी महाराजांच्या निधनाचे वृत्त दु:खद आणि धक्कादायक आहे. त्यांनी सामाजिक आणि आध्यात्मिक क्षेत्रात भरीव योगदान दिले. त्यांच्या अकाली निधनाने कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे.
- अशोक चव्हाण,
प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस
त्यांचे व्यक्तिमत्त्व कायम हसतमुख, उत्साही आणि ऊर्जा प्रदान करणारे होते. त्यांचे अकाली निधन मनाला चटका लावणारे आहे. निराशेवर मात करणारी नवी उमेद जागवण्याची अचाट क्षमता त्यांच्याकडे होती.
- राधाकृष्ण विखे-पाटील, विरोधी पक्षनेते, विधानसभा

Web Title: Bhayyuji Maharaj: The spiritual master who has influenced on politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.