नुपूर शर्मा यांची जीभ कापणाऱ्यास १ कोटींचे बक्षीस, भीम आर्मीने केली घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2022 08:37 PM2022-06-08T20:37:14+5:302022-06-08T20:38:38+5:30
Nupur Sharma : कानपूर हिंसाचाराची सूत्रधार नुपूर शर्मा असल्याचा आरोप भीम आर्मीने केला आहे.
नवी दिल्ली : भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल वादग्रस्त टिपण्णी केल्याने राजकीय वर्तुळात गढूळ वातावरण निर्माण झाले आहे. आता या वादात भीम आर्मीनेही (Bhim Army) उडी घेतली आहे. नुपूर शर्मा यांची जीभ कापणाऱ्याला १ कोटींचे बक्षीस देण्याची घोषणा भीम आर्मीचे प्रमुख नवाब सतपाल तन्वर यांनी आज (ता.८) केली आहे. कानपूर हिंसाचाराची (Kanpur Violence) सूत्रधार नुपूर शर्मा असल्याचा आरोप भीम आर्मीने केला आहे.
नुपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबराचा अपमान केला आहे. त्यामुळे करोडो मुस्लिम समाज दुखावला गेला आहे. मोदी सरकार जाणूनबुजून नुपूर शर्माला अटक करत नाही आहे. नुपूर शर्मा ही कानपूर हिंसाचाराची खरी सूत्रधार आहे. योगी सरकारने त्यांना आरोपी का बनवले नाही असा प्रश्न भीम सेनेचे संस्थापक आणि राष्ट्रीय अध्यक्ष नवाब सतपाल तन्वर यांनी केला आहे.
मोहम्मद पैगंबर यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी नुपूर शर्मा यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. पक्षातून निलंबनाची कारवाई केल्यानंतर आता मुंबई पोलीस समन्स पाठवू शकतात. पायधुनी पोलिसांनी नुपूर शर्मा यांच्या विरोधात एफआयआर दाखल केल्याचे सांगितले जात आहे. रझा अकादमीने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता.
नूपुर शर्मा यांच्या अडचणीत वाढ, मुंबई पोलीस पाठवू शकतात समन्स
नुपूर शर्मा यांच्या वादग्रस्त टिपण्णीवरून बराच गदारोळ झाला आहे. इस्लामिक देशांच्या संघटनेपासून ते कतार, कुवेत, इराण आणि पाकिस्तानने नाराजी व्यक्त केली आहे. भारताच्या आसपास, इस्लामिक सहकार्य संघटनेने (ओआयसी) भारताला घेरत संयुक्त राष्ट्र आणि मानवाधिकार संघटनांना भारतातील मुस्लिमांना लक्ष्य करण्याच्या विरोधात आवश्यक पावले उचलण्याचे आवाहन केले आहे. ओआयसीच्या वतीने भारतात मुस्लिमांविरोधातील हिंसाचारात वाढ झाल्याचे सांगण्यात आले.
दुसरीकडे, एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधत नुपूर शर्मा यांना भाजपमधून निलंबित करून चालणार नाही, असे म्हटले होते. नुपूर शर्माच्या अटकेची मागणी त्यांनी केली होती.