भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर यांची तुरुंगातून मुक्तता
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2018 06:17 AM2018-09-14T06:17:09+5:302018-09-14T06:19:30+5:30
तुरुंगातून बाहेर येताच चंद्रशेखर यांचा भाजपावर हल्लाबोल
सहारणपूर: गेल्या वर्षी सहारणपूरमध्ये झालेल्या जातीय हिंसाचार प्रकरणात अटकेत असलेले भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर यांची सुटका करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशमधीलयोगी आदित्यनाथ सरकारनं राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली चंद्रशेखर यांना अटक केली होती. मात्र शिक्षा पूर्णआधीच भाजपा सरकारनं त्यांची सुटका केली आहे. मध्यरात्री 2 वाजून 24 मिनिटांनी चंद्रशेखर यांची तुरुंगातून मुक्तता करण्यात आली. यानंतर त्यांनी आपल्या समर्थकांना संबोधित केलं. पुढील निवडणुकीत भाजपाचा पराभव करु, अशी गर्जना त्यांनी केली.
Bhim Army Chief Chandrashekhar alias Ravan, who was jailed under NSA charges in connection with 2017 Saharanpur caste violence case, was released from prison at 2:24 am today. Uttar Pradesh government ordered his early release yesterday pic.twitter.com/2pZlpk9tBO
— ANI UP (@ANINewsUP) September 13, 2018
चंद्रशेखर यांची शिक्षा नोव्हेंबरमध्ये पूर्ण होणार होती. मात्र उत्तर प्रदेशमधील भाजपा सरकारनं त्याआधीच त्यांची सुटका केली. तुरुंगातून बाहेर पडताच चंद्रशेखर यांनी आपल्या समर्थकांसह मोर्चा काढत भाजपावर निशाणा साधला. त्यावेळी त्यांच्या हातात संविधानाची एक प्रत होती. लढाई आता कुठे सुरू झाली आहे, असं त्यांनी यावेळी म्हटलं. लोकसभा निवडणुकीआधी भीम आर्मी आणि अनुसूचित जाती-जमातींची नाराजी दूर करण्यासाठी भाजपानं चंद्रशेखर यांची मुदतीआधीच सुटका केली जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मात्र तुरुंगातून बाहेर येताच चंद्रशेखर यांनी भाजपावर केलेला शाब्दिक हल्ला लक्षात घेता, हा डाव उलटण्याची शक्यतादेखील वर्तवण्यात येत आहे.
Saharanpur: Bhim Army Chief Chandrashekhar alias Ravan comes out of jail after Uttar Pradesh government ordered his early release. He was jailed under NSA charges in connection with the 2017 Saharanpur caste violence case pic.twitter.com/kqE0fz53Yj
— ANI UP (@ANINewsUP) September 13, 2018
उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागात भीम आर्मीचं प्राबल्य आहे. अनुसूचित जाती-जमातींच्या आंदोलनाच्या माध्यमातून या भागात आपली पाळंमुळं घट्ट रोवण्याचा भीम आर्मीचा प्रयत्न आहे. कैराना आणि नूरपूरमधील पोटनिवडणुकीत भाजपाला पराभव पत्करावा लागला होता. भीम आर्मीमुळे या जागा भाजपाला गमवाव्या लागल्या, असं भाजपाचे या भागातील नेते खासगीत कबूल करतात. राज्याच्या पश्चिम भागातील अनुसूचित जाती-जमाती आणि मुस्लिम मतांची मोट बांधण्यात भीम आर्मीला यश आलं आहे. भाजपाच्या दृष्टीनं ही चिंतेची बाबा आहे.