भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर यांची उमेदवारी हे भाजपचेच कारस्थान
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2019 08:16 AM2019-04-01T08:16:20+5:302019-04-01T08:16:49+5:30
बसपच्या मायावती यांचा आरोप
लखनऊ : दलितांच्या मतांची विभागणी व्हावी म्हणून भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर यांना वाराणसी लोकसभा मतदारसंघातून भाजपनेच उभे केल्याचा आरोप बहुजन समाज पक्षाच्या (बसप) प्रमुख मायावती यांनी रविवारी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीतून निवडणूक लढविणार असल्याचे चंद्रशेखर यांनी या महिन्याच्या प्रारंभी जाहीर केले होते. याबाबत मायावतींनी एका टिष्ट्वटमध्ये म्हटले आहे की, दलितांच्या मतांची विभागणी व्हावी या दुष्ट हेतूनेच भाजपाने चंद्रशेखर यांना पुढे केले आहे. भाजपाने रचलेल्या कटकारस्थानाचा भाग म्हणूनच भीम आर्मीची स्थापना झाली होती. दलितविरोधी भाजपने आता घाणेरडे राजकारण सुरू केले आहे.
मायावती म्हणाल्या की, चंद्रशेखर यांनी बसपामध्ये प्रवेश करावा असेही भाजपाकडून झालेले प्रयत्न आम्ही हाणून पाडले. दलित, अन्य मागासवर्गीय, अल्पसंख्याक यांच्या विरोधात असलेल्या व सरंजामशाही वृत्तीच्या भाजपला सत्तेतून खाली खेचणे देशहिताच्या दृष्टीने आवश्यक आहे. तसा विचार करून आगामी लोकसभा निवडणुकीत प्रत्येक दलिताने मतदान केले पाहिजे. त्यांचे एकही मत फुकट जाता कामा नये. भाजप पुन्हा सत्तेत आल्यास या गोष्टीचा मतदारांना भविष्यात पश्चाताप करण्याची पाळी येईल.
भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर यांनी शनिवारी वाराणसीत आपल्या प्रचाराला सुरूवात केली. मोदी हे फक्त श्रीमंतांनाच मदत करतात. कमी रकमेची कर्जे घेतलेल्यांना व गरिबांना ते छळतात असाही आरोप त्यांनी केला होता.