Bhim Army: सत्ता परिवर्तनासाठीची लढाई सुरूच राहिल, पराभवानंतर बोलले चंद्रशेखर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2022 08:05 PM2022-03-11T20:05:12+5:302022-03-11T20:08:57+5:30
चंद्रशेखर आझाद यांनी पराभवानंतर ट्विटर अकाऊंटवरुन पोस्ट लिहून मतदार आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत
लखनौ - उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपला पुन्हा एकदा मोठा विजय मिळाला आहे. यासोबतच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची प्रतिमाही राष्ट्रीय राजकारणाच्या पटलावर पोहोचली आहे. कारण, युपीत 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करुन दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होणारे योगी आदित्यनाथ हे पहिलेच मुख्यमंत्री ठरत आहेत. योगींनी गोरखपूर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांनी सहजच विजय मिळवला. येथे योगींविरुद्ध लढणारे भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांचा मोठा पराभव झाला आहे.
चंद्रशेखर आझाद यांनी पराभवानंतर ट्विटर अकाऊंटवरुन पोस्ट लिहून मतदार आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत. तसेच, उत्तर प्रदेशातील सत्ता परिवर्तनाची लढाई सुरूच राहणार असल्याचंही त्यांनी सांगतिलं. निवडणूक निकालातील जनादेशाचा आम्ही स्वीकार करतो, पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीत सर्वसामान्य जनतेसोबत आमची ओळख झाली. आता, बहुजन समाजाला सत्तेत बसविण्यासाठी बहुजन समाजातील महापुरुष, वीरांगनांची विचारधार बहुजन हिताय, बहुजन सुखायला पुढे न्यावे लागणार आहे. यापुढील संघर्षाला सर्वच कार्यकर्त्यांनी तयार राहावे, असे आवाहन मी करतो. सामाजिक व सत्ता परिवर्तनाची आपली लढाई सुरूच राहिल, असेही आझाद यांनी म्हटले.
बहुजन हिताय एवं बहुजन सुखाय को हमें आगे बढ़ाना है। इसके लिए संगठन को मजबूती देने के लिए जमीनी स्तर पर आंदोलन चलाना है। मैं आप सभी साथियों से अपील करता हूँ कि आप लोग जमीनी संघर्ष के लिए तैयार रहें, हमारी लड़ाई सामाजिक व सत्ता परिवर्तन के लिए जारी रहेगी सधन्यवाद। सादर जय भीम।
— Chandra Shekhar Aazad (@BhimArmyChief) March 10, 2022
आझाद यांना मिळाली 7543 मतं
गोरखपूर शहर मतदारसंघातून योगी आदित्यनाथ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. निकालाच्या दिवशी सकाळपासूनच ते निकालात बाजी मारताना दिसून आले. निवडणूक आयोगने अपडेट केलेल्या आकडेवारीनुसार शेवटचा निकाला हाती आला तेव्हा, योगी आदित्यनाथ यांना 1,64,170 मतं मिळाली आहेत. तर, योगींविरुद्ध समाजवादी पक्षाच्या शुभावती उपेंद्र दत्त शुक्ला यांना 60,896 मतं मिळाली आहे. आझाद समाज पक्षाकडून चंद्रशेखर आझात यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता, त्यांना केवळ 7543 मतं मिळाली. येथून त्यांची अनामत रक्कमही जप्त झाली आहे.