भीम आर्मीचा नवा पक्ष येणार; चंद्रशेखर आझाद आज घोषणा करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2020 08:20 AM2020-03-15T08:20:03+5:302020-03-15T08:21:40+5:30
सहारनपूरमध्ये दलित आणि ठाकुरांमध्ये झालेल्या वादामुळे भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर चर्चेत आले होते. सहारनपूर तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर केंद्र आणि उत्तरप्रदेश सरकारला आव्हाने देत आहेत.
भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद आज नोएडामध्ये पक्षाची घोषणा करणार आहेत. 2022मध्ये उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीवर लक्ष ठेवून पक्ष स्थापन होणार असल्याने स्थानिक राजकारणात वेगळी समीकरणे बनण्याची शक्यता आहे.
सहारनपूरमध्ये दलित आणि ठाकुरांमध्ये झालेल्या वादामुळे भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर चर्चेत आले होते. सहारनपूर तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर केंद्र आणि उत्तरप्रदेश सरकारला आव्हाने देत आहेत. सीएएला दिल्लीत जात विरोध दर्शविला आहे. यावेळी त्यांना तुरुंगात पाठविण्यात आले होते. तसेच अन्य राज्यांमध्येही आझाद यांना आंदोलनांवेळी तुरुंगाची हवा खावी लागली आहे.
रविवारी नोएडामध्ये आझाद नव्या पक्षाची स्थापना करणार आहेत. भीम आर्मीचे मेरठ जिल्हाध्यक्ष विकास हरित यांनी सांगितले की, पक्षाची घोषणा दिल्लीमध्येच होणार होती. या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर लोक जमणार होते. मात्र, कोरोना व्हायरसमुळे दिल्लीमध्ये कार्यक्रमासाठी परवानगी मिळाली नाही. यामुळे नोएडामध्ये मोठा कार्यक्रम टाळून पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये पक्षाची घोषणा केली जाणार आहे.
काय असेल नाव?
चंद्रशेखर आझाद यांच्या पक्षाचे नाव आझाद बहुजन पक्ष, बहुजन आवाम पक्ष किंवा आझाद समाज पक्ष असे असण्याची चर्चा आहे. विकास यांनी सांगितले की, या नव्या पक्षामध्ये बसपापासून अन्य पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते प्रवेश करणार आहेत. या पक्षामध्ये दलित, मुस्लिम आणि बहुजन समाजाचा भरणा केला जाणार आहे.