भीम आर्मीची दिल्लीत जोरदार निदर्शने
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2019 04:58 AM2019-12-21T04:58:34+5:302019-12-21T04:58:55+5:30
संघटनेचे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद निसटले; पोलिसांच्या हातावर तुरी
नवी दिल्ली : नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांनी शुक्रवारी जामा मशिदीजवळ जोरदार निदर्शने केली. परवानगी नसतानाही निदर्शने केल्याबद्दल ताब्यात घेतलेले चंद्रशेखर आझाद पोलिसांच्या हातावर तुरी देऊन निसटले. त्यांचा शोध सुरू आहे.
निदर्शने करणाऱ्या भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी हातात तिरंगी ध्वज घेतले होते. राज्यघटनेला वाचवा तसेच इन्किलाब झिंदाबाद अशा घोषणा ते देत होते. त्यातले काही जण सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ता हमारा हे गाणे गात होते. जामा मशिदीच्या एक क्रमांकाच्या प्रवेशव्दाराजवळ जमा झालेल्या या निदर्शकांपैकी काही जणांच्या हाती डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कांशीराम, भगतसिंह यांची छायाचित्रे असलेले फलक होते. दिल्लीमध्ये लागू केलेले जमावबंदीचे आदेश मोडून हजारो विद्यार्थी, विरोधी पक्षांचे नेते, सामाजिक कार्यकर्ते यांनी रस्त्यावर उतरून गेल्या काही दिवसांत निदर्शने केली होती. तोेच कित्ता भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी गिरवला.
जमावबंदीचे आदेश झुगारुन निदर्शने केल्याच्या आरोपावरून अटक केलेले भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांना जामा मशिदीच्या जवळ पोलिसांनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. तिथे यश न आल्यामुळे दर्यागंज भागामध्ये पुन्हा त्यांना पकडण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. मात्र त्यांच्या हातावर तुरी देऊन चंद्रशेखर आझाद तिथून निसटले असे भीम आर्मीच्या सूत्रांनी सांगितले. मात्र पोलिसांनी त्याला दुजोरा दिलेला नाही.
४८ जणांना अटक
गुजरातमधील अहमदाबाद शहरातील शहा-ए-आलम भागात गुरुवारी झालेल्या निदर्शनांनी हिंसक वळण घेतले होते. या प्रकरणी काँग्रेसचे नगरसेवक शहजाद खान पठाण व ४८ जणांना अटक करण्यात आली आहे. शहजाद खान पठाण यांनी जमावाला भडकाविण्याचा प्रयत्न केला असाही त्यांच्यावर आरोप आहे. निदर्शकांनी केलेल्या दगडफेकीत दोन पोलीस अधिकाऱ्यांसह २६ पोलीस जखमी झाले होते.
नव्याने घुसखोरी होणार नाही : सोनोवाल
नागरिकत्व दुरुस्ती कायद्यामुळे बांगलादेशमधून नव्याने घुसखोरी होण्यास प्रोत्साहन मिळणार नाही. या कायद्याचा आधार घेऊन बांगलादेशमधील एकही व्यक्ती आसाममध्ये येणार नाही असे आसामचे मुख्यमंत्री सवर्नंद सोनोवाल यांनी शुक्रवारी सांगितले. ते म्हणाले की, शेजारी राष्ट्रांत होणाºया धार्मिक छळाला कंटाळून तेथील जे नागरिक अनेक वर्षांपूर्वी भारतात आले त्यांनाच या कायद्याद्वारे भारतीय नागरिकत्व मिळणार आहे. अशा लोकांची संख्या मोजकी असेल. ही वस्तुस्थिती लक्षात घेतली तर आसाममधील मूळ रहिवाशांची वांशिक ओळख पुसली जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.