सल्ला भोवला, नातवाने केली आजोबाची हत्या
By admin | Published: January 11, 2015 04:45 PM2015-01-11T16:45:42+5:302015-01-11T16:46:01+5:30
अंमली पदार्थांचे व्यसन सोडून कामाला जा असा सल्ला देणा-या आजोबांची नातवाने हत्या केल्याची घटना चेन्नईमध्ये घडली आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
चेन्नई, दि. ११ - अंमली पदार्थांचे व्यसन सोडून कामाला जा असा सल्ला देणा-या आजोबांची नातवाने हत्या केल्याची घटना चेन्नईमध्ये घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी जेरोम बोस्को (वय २५) या तरुणाला अटक केली आहे.
चेन्नई पोर्ट ट्रस्टचे माजी कर्मचारी विल्यम्स बोस्को हे ऑस्ट्रेलियात मुलासोबत राहतात. पण गेल्या दोन महिन्यांपासून ते चेन्नईत नातू जेरोम बोस्कोकडे राहायला आले होते. जेरोमला अंमली पदार्थांचे व्यसन होते आणि या नादापायी त्याने नोकरीदेखील गमावली होती. विल्यम्स बोस्को हे वारंवार जेरोमला सुधारण्याचा सल्ला द्यायचे. सोमवारी विल्यम्स यांनी जेरोमला बँकेत न्यायला सांगितले आणि बँकेतून ८० हजार रुपये काढले. जेरोमने ८० हजारांपैकी १० हजार रुपये चोरले. हा प्रकार विल्यम्स यांना लक्षात आला व त्यांनी पुन्हा जेरोमला अंमली पदार्थांचे व्यसन सोडून नोकरीला जाण्याचा सल्ला दिला. यामुळे जेरोम भलताच संतापला आणि त्याने संतापाच्या भरात विल्यम्स यांची गळा दाबून त्यांची हत्या केली. हत्येनंतर आजोबांकडील उर्वरित पैसेही जेरोमने काढून घेतले व विल्यम्स यांचा मृतदेह सुटकेसमध्ये भरुन घरातील गच्चीवर ठेवला. दोन दिवसांनी सुटकेसमधून दुर्गंधी येऊ लागल्याने जेरोमने ती सुटकेस शहरातील निर्जन रस्त्यावर नेऊन फेकून दिली. पोलिसांना ही सुटकेस सापडल्यावर जेरोमचे क्रूरकृत्य समोर आले. पोलिस चौकशीत त्याने आजोबांच्या सल्ल्याला कंटाळून त्यांची हत्या केल्याची कबुली दिली.